शिवसेनेत जोरदार हालचाली, शिवसेना पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती

बंडखोर गटाला शह देण्‍यासाठी शिवसेनेने कंबर कसली 

Updated: Jun 26, 2022, 11:23 AM IST
शिवसेनेत जोरदार हालचाली, शिवसेना पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती title=

प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड : एकनाथ शिंदे यांच्‍या बंडाला चार दिवस उलटून गेले आहेत. शिवसेनेतही आता जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. रायगड जिल्‍हयातही राजकीय घडामोडींना वेग आलाय. जुने निष्‍ठांवत शिवसैनिक पुन्‍हा एकदा सक्रीय झाले आहेत. बंडखोर गटातील पदाधिकारयांची उचलबांगडी करण्‍यात आली असून तेथे नवीन पदाधिकारयांच्‍या नियुक्‍त्‍या करण्‍यात आल्‍या आहेत

बंडखोर गटाला शह देण्‍यासाठी शिवसेनेतील जुन्‍या निष्‍ठावंत शिवसैनिकांनी कंबर कसली आहे. लोकसभा निवडणूकीनंतर विजनवासात गेलेले माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते हे देखील सक्रीय झाले असून त्‍यांनी पनवेल इथं रणशिंग फुंकून कोकणचा दौरा सुरू केला आहे. बंडखोरांना कुठल्‍याही परीस्थितीत पराभूत करणार असा निर्धार त्‍यांनी बोलून दाखवला. आता नवीन पदाधिकारयांची नियुक्‍ती करून बंडखोरांना शह देण्‍याची रणनिती आखली आहे

आमदार महेंद्र दळवी यांच्‍याकडे अलिबाग, मुरूड, पेण, पाली या भागाच्‍या जिल्‍हाप्रमुख पदाची जबाबदारी होती परंतु ते स्‍वतःच या बंडात सामील झाल्‍याने त्‍यांना पदावरून हटवण्‍यात आलं आहे. आता दळवी यांच्या जागी अलिबागचे सुरेंद्र म्‍हात्रे यांची जिल्‍हाप्रमुखपदी वर्णी लागली आहे. 

तसेच महेंद्र दळवी यांचे समर्थन करणारे अलिबागचे तालुकाप्रमुख राजा केणी यांची पदावरून हकालपटटी करण्‍यात आली आहे. त्‍यांच्‍या जागी शंकर (महेश) गुरव यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. तर अलिबाग आणि पेण या दोन मतदार संघांच्‍या सहसंपर्कप्रमुखपदाची जबाबदारी किशोर जैन यांच्‍यावर सोपवण्‍यात आली आहे