ज्यांनी पतीचा मृतदेह पोहोचवला, त्यांनीच 'एकटी' म्हणून घर लुटलं! महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना

Nagpur Crime : नागपुरातून माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका रुग्णवाहिका चालकाने ज्याचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेला होता त्याच्याच घरी चोरी केली आहे. रुग्णवाहिका चालकाने मुलाच्या मदतीने ही चोरी केली होती.

आकाश नेटके | Updated: Aug 31, 2023, 01:13 PM IST
ज्यांनी पतीचा मृतदेह पोहोचवला, त्यांनीच 'एकटी' म्हणून घर लुटलं! महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना title=

Crime News : नागपुरात (Nagpur Crime) गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसतेय. अशातच नागपूरमध्ये माणुसकीला लाजवेल असा प्रकार समोर आला आहे. आजारी पतीच्या निधनानंतर अंत्यसंस्कारासाठी पत्नी मृतदेह नेत असतानाच चोरट्यांनी त्यांच्या घरात चोरी केली आहे. पतीच्या निधनाचे दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाच पत्नीवर आणखी एक मोठा आघात झाला होता. मात्र पोलिसांनी (Nagpur Police) सखोल तपास करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे ज्या रुग्णवाहिकेतून मृतदेह घेऊन जाण्यात येत होता त्याच्या चालकानेच चोरीचा डाव रचल्याचे समोर आले आहे.

आजारपणामुळे महिलेच्या पतीचे निधन झाले होते. पत्नी पतीचा मृतदेह घेऊन त्यांच्या मूळ गावी गेली होती. सिर्सी गिरड येथे पतीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कार सुरु असतानाच चोरट्याने महिलेचे घर फोडून दोन लाख रुपयांचा ऐवज पळवून नेला होता. मात्र हा सगळा चोरीचा डाव मृतदेह गावी घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिका चालकानेच रचला होता. रुग्णवाहिका चालकाने त्याच्या मुलाला सगळी माहिती देऊन ही चोरी घडवून आणली. महिला घरी परतल्यानंतर तिच्या हा सगळा प्रकार लक्षात आला. तक्रारीनंतर पोलिसांनी याप्रकरणी एका तरुणासह त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांना अटक केली आहे. 

सक्करधरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोमवार क्वार्टर परिसरात हा सगळा प्रकार घडला आहे. 25 ऑगस्ट रोजी फिर्यादी महिला पतीचा मृतदेह रुग्णवाहिकेतून घेऊन सिर्सी गिरड या मूळगावी अंत्यसंस्कारासाठी गेली होती. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी घर फोडून सुमारे दोन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. मात्र घराजवळ लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हा सगळा प्रकार कैद झाला होता. सीसीटीव्ही फुटेजवरुन पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला आणि त्यांना अटक केली. मात्र चौकशीमध्ये जी माहिती समोर आली त्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला.

अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिका चालकानेच महिलेला एकटं पाहून त्याच्या मुलाला चोरी करण्याची कल्पना दिली. त्यानुसार आरोपीने त्याच्या दोन अल्पवयीन मित्रांसह महिला अंत्यसंस्कारासाठी गेलेली असताना चोरी केली. पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतलं असून गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीचा मालही जप्त करण्यात केला आहे. या प्रकरणी रुग्णवाहिका चालक अश्वजित विश्वजित वानखेडे यालाही पोलिसांनी आरोपी केले आहे.