मास्क न लावणाऱ्यांवर नागपूर महापालिका आणि पोलिसांची संयुक्त कारवाई

अनेक लोक मास्क न लावताच उघड तोंडाने फिरताना दिसत आहेत.

Updated: Sep 10, 2020, 10:44 PM IST
मास्क न लावणाऱ्यांवर नागपूर महापालिका आणि पोलिसांची संयुक्त कारवाई title=
संग्रहित फोटो

नागपूर : नागपुरात कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता महापालिका आणि पोलिसांनी संयुक्तरित्या मास्क न लावणाऱ्या नागरिकांवर कारवाईला सुरुवात केली आहे. मात्र, तरीही शहरात विना मास्क फिरणाऱ्यांची संख्या कमी होत नाही. अनेक लोक मास्क न लावताच उघड तोंडाने फिरताना दिसत आहेत. तर काहींचे मास्क फक्त नावापुरताच कानाला लटकलेले दिसतात. 
 
तोंड आणि नाक उघडंच ठेऊन सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांना पायदळी तुडवत तरुणांचे समूह प्रत्येक भागातच उभे असल्याचं चित्र आहे. त्यामुळे काहींसाठी कोरोना परतला आहे की काय अशी शंका निर्माण होते. या सर्व प्रकारानंतर दोन दिवसांपासून मास्क न लावणाऱ्यांवर सुरु असलेल्या कारवाईने, गुरुवारी चांगलाच जोर धरला असून शहरात ठिकठिकाणी मास्क न लावणाऱ्या नागरिकांवर प्रत्येकी 200 रुपयांचा दंड लावत चालान कारवाई केली जात आहे.
 
महापालिकेने बुधवारी 657 जणांवर मास्क न लावण्यासंदर्भात कारवाई केली होती. तर पोलिसांनी 4 हजार 127 जणांना मास्क न लावण्यासंदर्भात दंड आकारला होता. पुन्हा गुरुवारीही मोठ्या संख्येने चालान बनवून इतरांसाठी धोका निर्माण करणाऱ्यांविरोधात कारवाई केली गेली आहे.
 
दरम्यान, नागपूरमध्ये एकूण कोरोनाबाधितांची संख्या 44 हजार 700 इतकी झाली आहे. त्यापैकी आतापर्यंत 24 हजार 209 रुग्ण बरे झाले असून 1193 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या नागपुरात 19 हजार 294 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.