पराग ढोबळे, झी मीडिया, नागपूर : जोपर्यंत लोकसंख्या नियंत्रण कायदा (Population Control Act) येत नाही तोपर्यंत प्रत्येक सनातनी व्यक्तीने पाच सहा मुलं जन्माला घातलीच पाहिजे असं वक्तव्य कथावाचक देवकीनंदन ठाकूर (devkinandan maharaj) यांनी केलं आहे. नागपूरात (Nagpur News) श्रीकृष्ण कथा वाचनासाठी आले असताना देवकीनंदन ठाकूर (Devikanan Thakur) यांनी हे विधान केले आहे. भारतात लोकसंख्येचा एवढा मोठा स्फोट झाला की कुणी विचारही करू शकत नाही असंही देवकीनंदन ठाकूर म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी सनातन बोर्ड (Sanatan Board) स्थापन करावा अशी मागणी केली आहे.
जेवढी होऊ शकतील तेवढी मुले जन्माला घाला
"सनातनी लोकांवर आक्रमण झाले असून आजही आपल्यावर अत्याचार होत आहेत. लोकसंख्या नियंत्रण कायदा आजपर्यंत लागू झालेला नाही. लोकसंख्येचा विस्फोट झाला आहे. चार बायका आणि चाळीस मुले पण कोणी बोलणारं नाहीये. मी परवाच सांगितले आहे की जोपर्यंत लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू होत नाही तोपर्यंत प्रत्येक सनातनीला जास्त मुले जन्माला घालायला हवीत. पाच सहा जेवढी होऊ शकतील तेवढी मुले जन्माला घालावीत. कमी करायची नाहीत. त्यासाठी वेळेवर लग्न व्हायला हवं हे महत्त्वाचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना असा देश हवा होता. विद्येची मंदीरे लव्ह मंदीरे बनत आहेत. जिथे शिक्षण दिलं जातं तिथे काय काय होत आहे. मी तर अनेक वेळा सांगितले आहे की लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू करा," असे देवकीनंदन ठाकूर महाराज म्हणाले.
25 वर्षांनी हा देश सेक्युलर राहिल का?
"आपला देश पुढच्या दहा वर्षात हिंदू राष्ट्र आणि सनातनी धर्म मानणारा देश झाला नाही तर 25 वर्षांनी काय होईल तुम्हाला ठाऊक नाही? आज लोकं आपल्याला ऐकवतात. 25 वर्षांनी हा देश सेक्युलर राहिल का? यामागचं वास्तव ठाऊक असेल तरच मी काय म्हटलं आहे याचा अर्थ समजेल. येणाऱ्या पिढीसाठी आपल्याला काही विचार करायचा आहे की नाही?," असंही देवकीनंदन ठाकूर यांनी म्हटलं आहे.
सनातन बोर्ड स्थापन करा - देवकीनंदन ठाकूर महाराज
देवकीनंदन ठाकूर महाराज यांनी यावेळी सनातन मंडळ स्थापन करण्याची मागणी केली आहे. आज अनेक ठिकाणी वक्फबोर्ड आहेत. त्यामुळे सनातन बोर्ड स्थापन करावे. या मंडळात सनातन धर्माचार्य असतील. मात्र केंद्र सरकारने हे याला आपल्या देखरेखीखाली ठेवावेत. आपण किती राज्यांमध्ये अल्पसंख्य आहोत याचा विचार करा. आपण किमान ९ राज्यांमध्ये अल्पसंख्य आहोत मात्र आपल्याला असं कुणी म्हणतही नाही. सरकार हिंदुत्ववादी असो किंवा इतर कुठल्या विचारांचं आपल्या अधिकारांची मागणी आपण आपल्या सरकारकडेच केली पाहिजे, असेही देवकीनंदन महाराज म्हणाले.