अमर काणे, झी मीडिया, नागपूर : गेल्या वर्षीपासून सुरु झालेला समृद्धी महामार्ग (Samruddhi Highway) अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. गेल्या वर्षी 11 डिसेंबर 2022 रोजी नागपूर ते शिर्डी (Nagpur To Shirdi) या महत्त्वाच्या टप्प्याचे लोकार्पण झाले होते. राज्याच्या 10 जिल्ह्यांतून जाणाऱ्या या महामार्गावर आतापर्यंत अनेक अपघात झाले आहेत. दुसरीकडे मोठा गाजावाजा करून समृद्धी महामार्गावरून सुरू करण्यात आलेली नागपूर- शिर्डी एसटी बससेवा स्थगित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
समृद्धी महामार्गावरून धावणाऱ्या एसटीचा खर्चही प्रवाशांअभावी निघत नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. इतकेच काय तर डिझेलचे पैसेही निघत नसल्याने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने समृद्धी महामार्गावरून धावणाऱ्या नागपूर- शिर्डी बस सेवेला स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. 11 डिसेंबर रोजी समृद्धी महामार्गाचे लोकार्पण झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने मोठा गाजावाजा करत 15 डिसेंबरपासून नागपूर ते शिर्डी अशी समृद्धी महामार्गावरील पहिली एसटी बस सेवा सुरू केली होती.
1300 रुपये इतके भाडे असलेल्या या सेवेच्या माध्यमातून आठ तासात शिर्डीला पोहोचता येत असल्याने या बस सेवेला मोठा प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा होती. शिवाय ज्येष्ठ नागरिकांकरता सवलतही होती..मात्र, अवघ्या तीन महिन्यातच समृद्धी महामार्गावरील पहिली एसटी बस सेवा बंद करण्याची नामुष्की एसटी प्रशासनावर ओढावली आहे. अपेक्षेप्रमाणे प्रवासी मिळत नसल्यामुळे ही बस सेवा स्थगित करण्यात आल्याची माहिती आहे.
झी 24 तासला मिळालेल्या माहितीनुसार नागपूर ते शिर्डी या बस सेवेला डिसेंबर महिन्यात एकूण आसन क्षमतेच्या तुलनेत 40.98 टक्के प्रवासी मिळाले होते. मात्र, जानेवारी महिन्यात त्यात कमालीची घट होऊन आसन क्षमतेच्या तुलनेत फक्त 13.51 टक्के प्रवासी मिळाले. फेब्रुवारी महिन्यात हा दर 8.58 टक्क्यांवर आला आहे. फेब्रुवारी महिन्यात तर अनेक दिवस एक ही प्रवाशाने या बसने प्रवास केला नाही. त्यामुळेच आता ही बस सेवा बंद ठेवण्याची वेळ एसटीच्या अधिकाऱ्यांवर आली आहे.
दरम्यान, आता पुढे शालेय परीक्षांचा काळ पाहता प्रवासी संख्या आणखी कमी होईल, हे लक्षात घेऊन एसटीच्या नागपूर विभाग नियंत्रकांनी एसटी व्यवस्थापनाकडे ही बस सेवा बंद करण्याची परवानगी मागत सध्या बस सेवा स्थगित ठेवली आहे. त्यामुळे राज्याच्या आर्थिक विकासाला चालना देऊ शकेल आणि गेम चेंजर ठरेल अशी अपेक्षा असलेला समृद्धी महामार्ग एसटीला मात्र आर्थिक दृष्ट्या पावलेला नाही असेच सध्याचे चित्र आहे.