बावनकुळे यांच्या मुलाच्या ऑडीने दिली 3 गाड्यांना धडक, मद्यधुंद अवस्थेत कार चालवल्याचा सुषमा अंधारेंचा आरोप

Nagur Accident : नागपुरात रविवारी मध्यरात्री वेगाने येणाऱ्या एका ऑडी कारने दोन कार आणि एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात दोन्ही कार आणि दुचाकीचे नुकसान झालं. धडक देणारी कार ही भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाची असल्याचं समोर आलं आहे. 

राजीव कासले | Updated: Sep 9, 2024, 08:30 PM IST
बावनकुळे यांच्या मुलाच्या ऑडीने दिली 3 गाड्यांना धडक, मद्यधुंद अवस्थेत कार चालवल्याचा सुषमा अंधारेंचा आरोप title=

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : नागपूरच्या सीताबर्डी परिसरात रविवारी मध्यरात्री झालेल्या अपघातावरून (Accident) आता राजकारण आणि आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. रविवारी मध्यरात्री एका भरधाव ऑडी कारनं (Audi Car) दोन कार आणि एका बाईकला उडवलं. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर गदारोळ झाला आणि पोलिसांनी या प्रकरणी अर्जुन हावरे चालक आणि त्याच्या शेजारी बसलेल्या रोहित चिंतमवार यांच्याविरोधात रॅश ड्रायव्हिंगच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केलाय. त्याचबरोबर दोघांच्या रक्ताचे नमुनेही तपासणीसाठी पाठवलेत.मद्यधुंद अवस्थेत कार चालवत असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

सुषमा अंधारे यांचा आरोप

मात्र ही कार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या (Chandrashekhar Bawankule) मुलाची असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी केलाय. ज्या अर्थी अपघातानंतर इतका गदारोळ झाला. मारहाण झाली, गोंधळ झाला त्या अर्थी गाडीचा नंबर अनेक लोकांच्या लक्षात होता. पण पोलिसांनी तो नंबर नोंदवून घेतला नाही. सीसीटीव्ही फुटेजचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो, पण गाडीचा नंबर जो तिथल्या प्रत्यक्षदर्शींनी नोंदवला तो नंबर MH 31 EK 3939, गाडी प्रताप कामदार नावाच्या व्यक्तीची आहे असं सुषमा अंधारे यांनी म्हटलंय. तसंच चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा गाडीत आहे म्हटल्यावर कोण इतकी मोठी रिस्क उचलून कामगिरी करणार आहे असं सांगत अंधारे यांनी थेट संकेत बावनकुळे यांचं नाव घेतलं आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांचं स्पष्टीकरण

तर आपल्या मुलाच्या नावाने ती कार असल्याचं बावनकुळेंनी मान्य करत, याप्रकरणी दोषी असलेल्यांना सोडलं जाणार नसल्याचं बावनकुळे म्हणालेत. पोलीस तपासात जे दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई करावी, मी कोणत्याही पोलीस यंत्रणेशी बोललो नाही. जो गु्न्हा दाखल होईल तो सर्वांसाठी समान असला पाहिजे, राजकारणात असो किंवा कोणी असो असं बावनकुळे यांनी सांगितलं आहे. पोलिसांनी स्पष्ट तपास करावा असंही बावनकुळे यांनी म्हटलंय.

काय आहे नेमकी घटना?

नागपुरात रविवारी मध्यरात्री वेगाने येणाऱ्या एका ऑडी कारने दोन कार आणि एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात दोन्ही कार आणि दुचाकीचे नुकसान झाले असून कार मधील प्रवासी किरकोळ जखमी झाले. नागपूरच्या सीताबर्डी पोलीस स्टेशन अंतर्गत मध्यरात्री साडे बारा वाजताच्या सुमारास काचीपुरा चौक ते रामदास पेठ कडे जाणाऱ्या रस्त्यावर हा अपघात झाला. पोलिसांनी याप्रकरणी कार चालवणारा चालक अर्जुन हावरे आणि त्याच्या शेजारी बसलेल्या रोनित चिंतमवार या दोघांच्या विरोधात रॅश ड्रायव्हिंगचा गुन्हा दाखल केला आहे.. मद्यधुंद अवस्थेत कार चालवत असताना हा अपघात झाल्याचं पोलिसांचा अंदाज असून पोलिसांनी अर्जुन हावरे आणि रोहित चिंतमवार या दोघांचे रक्ताचे नाव मुळे चाचणीसाठी पाठवले आहेत.