तुमची हिंमत कशी झाली? नांदेडमध्ये जमावाकडून तरुणाची धारदार शस्त्राने हत्या

Nanded Crime : नांदेडमधल्या या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. सुरुवातीला वरातीत नाचण्यावरुन दोन गटात झालेल्या वादातून तरुणाची पोटात चाकू भोसकून निर्घृणपणे खून करण्यात आल्याचे म्हटलं जात होतं. मात्र डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केल्यामुळे ही हत्या झाल्याचा आरोप कुटुबियांनी केला आहे.

आकाश नेटके | Updated: Jun 4, 2023, 04:01 PM IST
तुमची हिंमत कशी झाली? नांदेडमध्ये जमावाकडून तरुणाची धारदार शस्त्राने हत्या  title=
(प्रातिनिधीक छायाचित्र - PTI)

Crime News : पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्राला हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. महाराष्ट्रातील नांदेड (Nanded Crime) जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर (dr babasaheb ambedkar) यांची जयंती साजरी केल्याच्या रागातून काही लोकांनी एका 24 वर्षीय अनुसूचित जातीच्या तरुणाची निर्घृण हत्या केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला होता. या हत्येप्रकरणी पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. या हल्ल्यामध्ये मृत तरुणाच्या भावासह आईही जखमी झाली आहे.

अक्षय भालेराव असे मृत तरुणाचे नाव असल्याचे समोर आले आहे. नांदेड पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ही घटना दोन दिवसांपूर्वी बोंढार हवेली गावात घडली होती. पोलिसांनी सांगितले की, अक्षय भालेराव गुरुवारी सायंकाळी एका रस्त्यावरून जात होता. त्याचवेळी एका लग्नाच्या वरातीत आरोपी हातात तलवार घेऊन नाचत होते. त्याचवेळी आरोपींनी अक्षय भालेराव आणि त्याच्या भावावर हल्ला केला.

पोलिसांनी सांगितले की, अक्षय भालेराव आणि त्याचा भाऊ आकाश यांना पाहताच एका आरोपीने त्यांची हिम्मत कशी झाली, असे म्हणत वाद घालण्यास सुरुवात केली. या प्रकरणावरून जोरदार वादावादी झाली. त्यानंतर, आरोपींनी अक्षय भालेरावला बेदम मारहाण करून चाकूने वार केले. आरोपींनी अक्षयच्या भावालाही बेदम मारहाण केली. आरोपींनी अक्षयच्या पोटात चाकूने सपासप वार केले. त्यानंतर दोन गटात दगडफेक देखील झाली. या घटनेनंतर अक्षयला तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

मृत आकाश भालेराव याचा भाऊ आकाश भालेराव याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संतोष संजय तिडके, कृष्णा गोविंद तिडके, नीळकंठ रमेश तिडके, नारायण विश्वासनाथ तिडके, शिवाजी दिगंबर तिडके व एकूण 9 जणांविरुद्ध खून व अॅट्रॉसिटी कायद्याचा गुन्हा दाखल केला आहे. यातील 7 आरोपींना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला 9 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर 2 फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

गुन्हेगारांना त्यांची जागा दाखवा - शरद पवार

"नांदेडची घटना अत्यंत निंदनीय आहे. ही घटना महाराष्ट्राला शोभणारी नाही, असं सांगतानाच राज्य सरकारने या घटनेच्या खोलात जाऊन जे कुणी गुन्हेगार असतील त्यांना त्यांची जागा दाखवावी. सरकारने या खून प्रकरणाची सखोल चौकशी करावी," अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे.