सतिश मोहिते, झी मीडिया, मुंबई: शेतकरी आपल्या शेतात वर्षभर राब राब राबतो. पण अवकाळी पाऊस, बोगस बियाणे, हमीभावात फसवणूक अशा अनेक कारणांमुळे त्याची मेहनत वाया जाते. अशावेळी मेहनत केली पण वाया गेली असे त्याला डोक्यावर हात मारुन म्हणावे लागते. पण नांदेडचे शेतकरी आता मेहनत केली आणि फळाला आली, असे म्हणून लागले आहेत. कारण हळदीने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवले आहे.
इतिहासात पहिल्यांदाच नांदेडमध्ये हळदीला 13 हजार रुपये प्रति क्विंटल चा भाव मिळालाय. ज्या शेतकऱ्यांनी हळद विकली नव्हती त्या शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा होतोय. नांदेडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळद विकण्यासाठी शेतकरी गर्दी करत आहेत. सुरुवातीला हळदीला 6 हजार ते 8 हजार प्रती क्विंटलपर्यंत भाव होता. आता मात्र 13 हजार रुपये भाव मिळतोय.
नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बीटमध्ये इतिहासात पहिल्यांदाच एवढा भाव मिळालाय. दररोज जवळपास 3 हजार क्विंटल हळद बाजार समितीमध्ये विक्रीला येत आहे. यंदा हळदीचा पेरा कमी झालाय त्यामुळे हळदीला चांगला भाव मिळाल्याचे जाणकार सांगत आहेत. हळदीला विक्रमी भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.
साधारणतः मे महिन्यात हळद काढणी आणि वाळवणी होत असते. पैश्यांची गरज असल्याने अनेक शेतकरी मे महिन्यात हळद विक्रीला काढतात. हळदीला जवळपास 6 ते 8 हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळतो. अनेक शेतकरी वेअर हाऊस ला हळद ठेऊन भाव वाढल्यावर हळद विक्री करतात.
मे महिन्यात एकदाच मोठ्या प्रमाणात हळद विक्रीला आल्याने भाव कमी होत होतात. हळद एकदाच विक्रीला काढू नये त्यामुळे भाव पडतील असे मत जाणकारांनी व्यक्त केले होते. जून, जुलै मध्ये हळदीचे भाव थोडे वाढतात. यंदा मात्र हळदीला विक्रमी 13 हजार प्रती क्विंटल चा भाव मिळाला.