सतीश मोहिते, झी २४ तास, नांदेड : नांदेडमध्ये गाजलेल्या 'सैराट' प्रकरणात बहीण आणि तिच्या प्रियकराची हत्या केल्याप्रकरणी दिगंबर दासरेला फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीय. भोकर न्यायालयानं हा निर्णय दिलाय. जुलै २०१७ मध्ये पूजा दासरे आणि तिचा प्रियकर गोविंद कराळेची हत्या तिच्याच भावानं केली होती. ही हत्या करणाऱ्या दिगंबर दासरेला फाशी सुनावण्यात आलीय. तर त्याला साथ देणारा त्याचा चुलत भाऊ मनोज दासरेला जन्मठेप सुनावण्यात आलीय.
नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यात हे दुहेरी हत्याकांड घडले होते. 'सैराट' चित्रपटातील घटनेप्रमाने एका भावाने सख्खी बहिण आणि तिच्या प्रियकराची गळा चिरुण हत्या केली होती. २४ जुलै २०१७ रोजी नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यात अंगावर काटा आननारी ही घटना घडली होती.
पूजा आणि गोविंद कऱ्हाळे या दोघांचे प्रेमसंबंध होते. याची कुणकुण लागल्यानंतर पूजाच्या कुटुंबियांनी तिचे लग्न दुसऱ्याच एकाशी लावून दिले होते. पण पूजा काही दिवसांतच आपल्या प्रियकराकडे घरातून न सांगता निघून गेली. पूजाचा पती ज्योतिबा वर्षेवार याने भोकर पोलिसांत पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती
पूजा आणि गोविंद दोघे तेलंगनातील एका गावी गेले होते. याची माहिती मिळाल्यानंतर पूजाचा भाऊ दिगंबर दासरे आणि चुलत भाऊ मोहन दासरे त्या गावी गेले... दोघांची समजूत काढण्याचा बनाव करत त्या दोघांना दुचाकीवर भोकरकडेच्या दिशेनं आणलं गेलं. मात्र वाटेतच आरोपींनी अगोदर गोविंद आणि नंतर पूजाची कोयत्याने गळा चिरून हत्या केली.
गळा चिरलेल्या अवस्थेत पूजा रस्त्यावर येऊन मदतीची याचना करीत होती... पण तिला मदत करण्याऐवजी अनेकांनी असहाय्य पूजाचे मोबाइल चित्रीकरण केले. काही वेळानं तिथेच तडफडत पूजानं प्राण सोडला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली होती.
हत्येनंतर आरोपी दिगंबर दासरे स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाला होता. या प्रकरणात भोकर न्यायालयाने आरोपी दिगंबर दासरे याला दुहेरी हत्येसाठी फाशीची तर त्याला मदत करणारा मोहन दासरे याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
मयत पूजा आणि गोविंद दोघेही शिक्षित होते. गोविंदचा फोटोग्राफीचा व्यवसाय होता... पण प्रेमाला विरोध असल्याने माथेफिरु भावाने दोघांची हत्या केली. प्रेमाला अजूनही बुरसटलेला समाज मान्यता देत नसल्याचे पुन्हा एकदा या घटनेमुळे अधोरेखीत झाले.