बेधडक वाटणारे नारायण राणे हतबल झालेत का?

भाजपनं नारायण राणेंना झुलवत ठेवलं आहे.

Updated: Sep 20, 2019, 06:58 PM IST
बेधडक वाटणारे नारायण राणे हतबल झालेत का? title=

मुंबई : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी भाजपमध्ये जाणार असल्याची घोषणा केली असली तरी भाजपनं मात्र त्यांना झुलवत ठेवलं आहे. शिवसेनेकडे बोट दाखवत भाजप राणेंचा प्रवेश टाळत असल्यानं एरवी बेधडक वाटणारे राणे हतबल झाल्याचं दिसत आहे. कोकणचा ढाण्या वाघ अशी ओळख असलेल्या राणेंची सध्याची अवस्था त्यांच्या चाहत्या-कार्यकर्त्यांना अस्वस्थ करणारी आहे. आपला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष गुंडाळून विनाशर्त पक्षांतरासाठी तयार असलेले राणे भाजप प्रवेशाची तारीख पे तारीख स्वतःच जाहीर करत असताना भाजप नेते मात्र त्यांना प्रतिसाद देताना दिसत नाहीत. 

नारायण राणेंनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा गणेश चतुर्थीआधीच केली होती. पण एरवी प्रवेशाचा धडाका लावणाऱ्या भाजपानं राणेंना प्रवेशासाठी तंगवलं आहे. प्रवेशाची नवनवी तारीख जाहीर करून राणे हेडलाईन्समध्ये जागा मिळवत असले तरी, भाजपचे नेते त्यांचं स्वागत करण्याऐवजी शिवसेनेकडे बोट दाखवून मोकळे होतात.

एरवी प्रत्येक बाबतीत शिवसेनेला गृहित धरणारे भाजपा नेते राणेंच्या प्रवेशावर शिवसेनेला इतकं महत्व देतील याबाबत शंका आहे. पण राणेंना असं झुलवत ठेवून त्यांची भाजपला फारशी गरज नाही असा संदेशच राणेंना द्यायचा असावा. दुसरीकडे भाजपा प्रवेश झाला नाही तर राणेंचे समर्थक भाजपा-शिवसेनेत जातील अशी राणेंनाही भीती आहे. त्यामुळे राणेंना आता कोणत्याही अटी-शर्ती न घालता भाजपमध्ये सामिल व्हावं लागेल. राणेंच्या या हतबलतेमुळे त्यांच्याशी कट्टर वैर बाळगणाऱ्या शिवसेना नेत्यांचा उकाळ्या फुटल्या नाहीत तरच नवल...

राणे असोत किंवा शिवसेना.... भाजपाचं एकच धोरण दिसतंय. ते म्हणजे पाहुण्याच्या काठीनं साप मारण्याचं.... म्हणजे राणेंना प्रवेश द्यायचा नसेल तर शिवसेनेचं नाव पुढे करायचं. आणि युती झाली नाही तर राणेंना प्रवेश देऊन शिवसेनेविरोधात वापरायचं.... पण या धोरणानं कोकणच्या राजाची झालेली अवस्था त्यांच्या आजवरच्या प्रतिष्ठेला न शोभणारी आहे.