close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

औरंगाबाद मध्य मतदारसंघासाठी सेना-भाजपमध्ये रस्सीखेच, एमआयएम बाजी मारणार?

दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होणार ?

Updated: Sep 20, 2019, 06:36 PM IST
औरंगाबाद मध्य मतदारसंघासाठी सेना-भाजपमध्ये रस्सीखेच, एमआयएम बाजी मारणार?

विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्य़ातील एक महत्वाचा मतदारसंघ म्हणजे औरंगाबाद मध्य. याच मतदारसंघातून एमआयएमचे इम्तियाज जलील हे आमदार झाले, त्यामुळे एमआयएम या मतदारसंघाला आपला गड मानतात, गेल्यावेळी युती नव्हती म्हणून इम्तियाज जिंकले हे खरं असलं तरी आताही य़ा जागेसाठी शिवसेना भाजपमध्ये रस्सीखेच सुरु आहे. 

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये एमआयएमने जागा जिंकली आणि राज्याच्या राजकारणात एमआयएमचा प्रवेश झाला. त्यामुळे यावेळच्या निवडणुकीसाठीही ही जागा एमआयएमसाठी अती महत्वाची आहे. विकासकामांचा पाढा वाचून इम्तियाज हा मतदारसंघ जिंकणारच असा दावा करत आहेत.

अशीही चर्चा आहे की वंचीत बहूजन आघाडीत एमआयएम असतांना आंबेडकरांनी ही जागा एमआय़एमला नाकारली म्हणूनच युतीत बिघाडी झाली, या जागेसाठी एमआयएमही चांगलंच आक्रमक होतं, कारण त्यांना यावेळीही इथून विजयाची शक्यता वाटते, मतदारसंघात मुस्लीम टक्का चांगला आहे, अनुसुचित जातीचे लोकही बहूसंख्य आहेत, याचाच फायदा एमआयएमला ही घ्यायचा आहे. आता काडीमोड झाल्यानं वंचितला सुद्धा ही जगा जिंकायची आहे. इम्तियाज खासदार झाले असले तरी त्यांचा माणूस जिंकणार असं त्यांच म्हणणं आहे.
 
दुसरीकडे याच जागेवरून शिवसेना भाजपमध्येही रस्सीखेच सुरु आहे, दोन्ही पक्ष याठिकाणी आपली ताकत असल्याचं सांगतात, गेल्यावेळेस शिवसेना भाजप वेगळी लढली त्यामुळं एमआयएम जिंकलं, मात्र आता भाजपची ताकत वाढली आहे, युतीच्या जागावाटपनुसार ही जागा शिवसेनेची आहे, मात्र आता या जागेवर भाजपचे शहराध्यक्ष इच्छूक आहे, त्यामुळं ही जागा शिवसेनेला नको तर भाजपला मिळाली अशी मागणी भाजपनं केली आहे. तर शिवसेना ही जागा आमचीच असल्याचं सांगत चर्चाही नको अशी भूमिका घेते आहे.
 
औरंगाबाद मध्य ही प्रतिष्ठेची जागा आहे, सगळ्याच पक्षांना ही आपल्या ताब्यात हवी आहे, मात्र संधी युतीलाच असल्याचं तज्ञ सांगत आहेत. मात्र युती झाली नाही, तर पुन्हा एमआयएमला संधीही मिळण्याचीही शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळं जागा कुणाची या भांडणाच युतीलाच नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 
मध्यची ही जागा एमआयएमला जिंकायचीय आहे. शिवसेनेलाही जिंकायची आणि भाजपलाही, अशात आता सगळेच या जागेसाठी मागे लागले आहे, यात शिवसेना भाजपमध्ये वाद सुद्धा होण्याची शक्यता आहे, आता या वादाचा फायदा घेत एमआयएमगड राखणार का की युती वा अन्य कुणी सुरुंग लावणार हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.