महापौरपदाची निवडणूक: फोडाफोडी टाळण्यासाठी नाशिकचे भाजप नगरसेवक सहलीला

नाशिकच्या महापौरपदासाठी येत्या 22 नोव्हेंबरला निवडणूक

Updated: Nov 16, 2019, 12:10 PM IST
महापौरपदाची निवडणूक: फोडाफोडी टाळण्यासाठी नाशिकचे भाजप नगरसेवक सहलीला title=

नाशिक : नाशिकच्या महापौरपदासाठी येत्या 22 नोव्हेंबरला निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठीची अर्ज वाटपाची प्रक्रिया आज पासून सुरू होतेय.या निवडणुकीसाठी सत्तारूढ भाजपला शह देण्यासाठी शिवसेनेने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केल्याने नाशिकचा महापौर पदासाठी फोडाफोडीचे राजकारण रंगणार आहे. खबरदारीचा उपाय म्हणून भाजपचे नगरसेवक आज सहलीसाठी रवाना होणार आहेत या नगरसेवकांच्या सुरक्षेची जबाबदारी तिन आमदारांच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकीमुळे महापौरांना मुदतवाढ देण्यात आली होती. आधी ही मुदतवाढ १५ डिसेंबर पर्यंत असेल असं कळत होतं पण २२ नोव्हेंबर रोजी ही मुदतवाढ संपेल असं नगरविकास विभागाने म्हटल्यानंतर नव्या महापौराची निवड करण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. सोबतच इच्छूक उमेदवारांनी प्रयत्न ही सुरु केला आहेत.

काही दिवसांपूर्वीच राज्यभरातील २७ महापालिकांच्या महापौरपदाची आरक्षण सोडत काढण्यात आली. ज्यामध्ये नाशिकचे १६ वे महापौर हे सर्वसाधारण गटाचे असणार आहेत. 

नाशिक महापालिकेतही गेल्या तीन दशकांच्या इतिहासात पहिल्यांदाच महापौरपद खुल्या वर्गासाठी खुले झाल्याने अनेकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. सध्या भाजपकडे 65, शिवसेनेकडे 34, राष्ट्रवादी काँग्रेसकडे 12, मनसे आणि इतर मिळून नऊ जागा आहेत, तर दोन पद रिक्त आहेत. त्यामुळे राज्यात रंगलेला खेळ आता नाशिकमध्येही येत्या काळात रंगणार आहे. भाजपचे माजी आमदार बाळासाहेब सानप हे राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेल्यामुळे शिवसेनेचं पारडे जड झाले आहे. त्यामुळे येत्या काळात गिरीश महाजन यांची प्रतिष्ठा नाशिकमध्ये पणाला लागणार आहे.

राज्यात युती तुटल्यामुळे भाजपच्या नगरसेवकांना फोडण्याची शक्यता पाहता. भाजपने आधीच खबरदारीचा उपाय म्हणून नगरसेवकांना सहलीला पाठवले आहे.