Nashik Bus Fire : मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर; मुख्यमंत्र्यांची घोषणा

या घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Updated: Oct 8, 2022, 02:03 PM IST
Nashik Bus Fire : मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर; मुख्यमंत्र्यांची घोषणा title=

नाशिक : शनिवारी सकाळी नाशिकमध्ये दुर्देवी अपघात झाल्याची बातमी समोर आली. अपघातानंतर एका खाजगी बसने पेट घेतला. बसला लागलेल्या या आगीमध्ये एकूण 12 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या या दुर्घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. शिवाय अपघातग्रस्त ठिकाणी असलेले पोलीस आणि आयुक्तांशी चर्चा केली आहे. 

यासंदर्भात झी 24 तासशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, झालेली घटना अतिशय दुर्देवी आहे. तिथल्या जिल्हाधिकारी आणि सिव्हील सर्जनशी मी सातत्याने संपर्कात आहे. दुर्घटनेमध्ये जखमी रूग्णांच्या उपचारांमध्ये कोणताही त्रुटी राहणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. तसंच रूग्णांच्या उपचारांसाठी खाजगी रूग्णालय आणि डॉक्टरांचीही मदत घेतली जाणार आहे. 

मृतांच्या नातेवईकांना शासनाच्या वतीने 5 लाख रूपये देण्यात येणार आहेत. तसंच जखमींवर शासनाच्या वतीने उपचार देण्यात येतील. ट्रकच्या डिझेल टँकला बसने धडक दिल्याने या टँकने पेट घेतल्याची प्रथमदर्शनी माहिती आयुक्तांनी दिली आहे. शिवाय याची सखोल चौकशी केली जाणार असल्याचंही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय.

मिळालेल्या माहितीनुसार, चिंतामणी ट्रॅव्हल्सची ही बस यवतमाळवरून मुंबईला येत होती. पहाटे साडे पाच वाजता या बसला अपघात झाला. बसने पेट घेतल्याने एकूण 12 जणांचा होरपळून मृत्यू झालाय. या 12 जणांमध्ये एका चिमुरड्याचाही समावेश आहे.

अग्निशमक दलाकडून बसला लागलेली आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र तोपर्यंत उशीर झाला आणि बस जळून खाक झाली. बसमध्ये आणखी काही प्रवाशी असण्याची भीती आहे.