Nashik Crime News: बदलापूरमधील शाळेमध्ये दोन चिमुकल्यांबरोबर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना ताजी असून त्यावरुन राज्यातील राजकारण तापलेले असताना नाशिकमधून शालेय विद्यार्थीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. नाशिकमध्ये पाचव्या इयत्तेत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर खासगी क्लासमधील शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे. आरोपी शिक्षकाने या मुलीबरोबर अंगलट करून अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार उपेंद्रनगर भागात घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार उपेंद्रनगर येथे ज्ञानेश्वरी क्लासेस नावाच्या खासगी क्लासमध्ये हा प्रकार घडला आहे. हा क्लासचा कृष्णा गजानन दहिभाते आणि त्याची पत्नी चालवते. कृष्णा दहिभाते विद्यार्थ्यांना विज्ञान व इंग्रजी विषय शिकवतो तर त्याची पत्नी गणित व इतर विषय विद्यार्थ्यांना शिकविते. गुरुवारी (दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी) कृष्णा दहिभाते याने त्याच्याच क्लासमधील पाचवीत शिकणाऱ्या 11 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीशी अंगलट केली. कृष्णा दहिभातेने या विद्यार्थीबरोबर अश्लील कृत्य केले. क्लास सुटल्यानंतर पीडित विद्यार्थीने थेट घरी गेली.
घरी गेलेली पीडित विद्यार्थिनी भेदरलेली दिसल्याने तिच्या आई-वडिलांनी विश्वासात घेऊन तिला नेमकं काय घडलंय? तू एवढी घाबरलेली का आहेस असं विचारल्यानंतर आपण उद्यापासून क्लासला जाणार नाही, असे तिने पालकांना सांगितले. पालकांनी यामागील कारण विचारले असता पीडित विद्यार्थीनीने क्लासच्या शिक्षकाने अंगलट करून अश्लील कृत्य केल्याची माहिती दिली.
"तू तुझ्या घरी काही सांगितले. तर उलट तुझीच तक्रार करेन, असा दम या शिक्षकाने दिला," असं या पीडितेने सांगितले. या विद्यार्थिनीच्या पालकांनी शुक्रवारी सकाळी क्लासमध्ये जाऊन शिक्षकाच्या पत्नीस मुलीने सांगितलेली बाब सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीबरोबरच त्याच्या पत्नीने कोणताही प्रतिसाद न दिल्याने त्यांनी अंबड पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दिली. त्यानुसार क्लासचालक कृष्णा दहिभातेविरोधात 'पोस्को' अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताला रात्री अटक करण्यात आली असून, अधिक तपास पोलीस करत आहेत.
चंद्रपुरमध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या बस स्टँडच्या टॉयलेटमध्ये तरुणीवर सामुहिक बलात्कार करण्यात आला आहे. तर, सिंदखेड राजा तालुक्यात एका शिक्षकाने विद्यार्थीनीवर अत्याचार केला आहे. मागील काही दिवसांपासून सातत्याने राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये अशाप्रकारच्या घटनांची माहिती समोर येत असून कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात प्रश्न उपस्थित केले जात आहेत.