पती आत्महत्या करताना पत्नी बाजूला बसून पूजा करत होती, नाशिकमधील घटनेनंतर खळबळ; नेमकं काय घडलं?

Nashik Crime News: नाशिक येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 45 वर्षांच्या व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.   

मानसी क्षीरसागर | Updated: Sep 22, 2024, 05:03 PM IST
 पती आत्महत्या करताना पत्नी बाजूला बसून पूजा करत होती, नाशिकमधील घटनेनंतर खळबळ; नेमकं काय घडलं? title=
Nashik crime news young man dies y suicide while his wife performing poja

Nashik Crime News: नाशिकमध्ये एका व्यक्तीने गळफास घेत आत्महत्या केली. या व्यक्तीच्या मृतदेहासमोरच पूजा मांडली होती तर त्याची पत्नी पूजाविधी करण्यास बसली होती. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यावरुन सुरुवातीला हा जादूटोण्याचा प्रकार असू शकतो, असा संशय व्यक्त करण्यात येत होता. मात्र, पोलिस चौकशीत भलतेच सत्य समोर आले आहे. 

नाशिक रोड येथील नवनाथ घायवट यांनी 11 सप्टेंबर रोजी गळफास घेत आत्महत्या केली. नवनाथ यांचा गळफास घेतलेल्या अवस्थेतील पतीच्या लटकत्या मृतदेहासमोर मांडलेल्या पूजासाहित्याजवळ त्याची पत्नी पूजाविधी करण्यासाठी बसली असल्याचा व्हिडिओ आज सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा प्रकार अघोरी आणि जादूटोण्याचा असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला शिवाय तो व्हिडिओ व्हायरल झाल्याने जेलरोड भागात  जादूटोण्याच्या आणि अंधश्रद्धेच्या प्रकारातून पतीचा बळी दिला गेल्याची चर्चा सुरू होती. मात्र या चर्चेचे नाशिकरोड पोलिसांनी खंडन केले आहे. 

नवनाथ यांची आत्महत्या हा प्रकार अघोरी किंवा जादूटोण्यातून झालेला नसून मानसिक व कौटुंबिक जाचातून घडला असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. नागरिक मात्र या व्हिडिओच्या आधारे शंका उपस्थित करत आहेत. या व्हिडिओत छताला लटकलेल्या अवस्थेतील नवनाथ घायवट यांच्या मृतदेहाच्या खाली आणि आजूबाजूला धार्मिक पूजा मांडलेली दिसून येते. जवळच एक महिला बसलेली दिसते. याशिवाय मृतदेहाच्या अंगावरही ठिकठिकाणी हळद व कुंकवासारखे पूजेचे साहित्य लावलेले दिसून येत असल्याने हा प्रकार अघोरी आणि जादूटोण्याचा असल्याची शंका नागरिकांनी व्यक्त केली होती.

मात्र या प्रकरणात दुसरी बाजूदेखील उजेडात येत आहे. नवनाथ घायवट या व्यक्तीचा मृत्यू हा गळफास घेतल्याने झाला असून जादूटोणा, अघोरी प्रकराचा या घटनेशी काहीही संबंध नसल्याच नाशिकरोड पोलिसांनी सांगितलं आहे. मयत नवनाथ याची पत्नी ही मानसिक रुग्ण असून तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. घटनेच्या दिवशी त्यांच्या घरी दुर्गाष्टमीची पूजा आयोजित केलेली होती. याचवेळी कदाचित त्यांच्यात काहीतरी कौटुंबिक कलह झाला असण्याची आणि त्यातून पत्नीच्या त्रासाला कंटाळून नवनाथने गळफास घेऊन आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. घायवट यांचे किराणा दुकान असून मुले शिक्षणासाठी पुण्यात आहेत. तर घायवट यांच्या पत्नीवर सुरू असलेल्या मानसिक वैद्यकीय उपचारांची कागदपत्रे पोलिसांनी हस्तगत केली आहेत.