महाविकास आघाडीमध्ये निधी वाटपावरुन वाद पेटला, भुजबळांविरोधात शिवसेनेचे हे आमदार न्यायालयात

 Nashik District funds : महाविकास आघाडी सरकारमधील वाद उफाळण्याची शक्यता आहे. निधी वाटपावरुन हा वाद पेटला आहे. 

Updated: Sep 24, 2021, 11:05 AM IST
महाविकास आघाडीमध्ये निधी वाटपावरुन वाद पेटला, भुजबळांविरोधात शिवसेनेचे हे आमदार न्यायालयात

नाशिक : Nashik District Planning Committee allocation of funds : महाविकास आघाडी सरकारमधील वाद उफाळण्याची शक्यता आहे. निधी वाटपावरुन हा वाद पेटला आहे. आता शिवसेनेच्या आमदारांनी नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यावर आरोप करत न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेत वाद उफाळण्याची शक्यता आहे. पालकमंत्री भुजबळ निधी विकत असल्याचा आरोप शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी केला आहे. त्यांनी आता न्यायालयात धाव घेतली आहे. (Chhagan Bhujbal vs Suhas Kande)

जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरून नाशिकमध्ये महाविकास आघाडीमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. पालकमंत्री आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) ठेकेदारांना निधी विकत असल्याचा आरोप नांदगावचे शिवसेना आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांनी केला आहे. निधी वाटपावरून त्यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे. 

जिल्हाधिकारी सुरज मांढरे आणि जिल्हा नियोजन समितीच्या अधिकाऱ्यांनादेखील यात प्रतिवादी करण्यात आले आहे. भाजपकडून महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना टार्गेट केले जात असताना आता आघाडीतील घटक पक्षाचे आमदारच सरकारच्या मंत्र्यावर आरोप करीत असल्याने महाविकास आघाडीतील नेत्यांची चिंता वाढली आहे.

भुजबळ जिल्हा नियोजन समितीच्या अध्यक्षपदाचा गैरवापर करीत मर्जीतील आणि समता परिषदेच्या कार्यकर्त्यांना कामे देत असल्याचा गंभीर आरोपही कांदे यांनी केला आहे. भुजबळांनी मात्र या आरोपांचे खंडन केले आहे. नांदगावच्या आढावा बैठकीत भुजबळ - कांदे यांच्यात खडाजंगी झाली होती. आमदार कांदे हे भुजबळ पुत्र माजी आमदार पंकज भुजबळ यांचा पराभव करून नांदगावमधून विजयी झाले आहे. त्यामुळे या दोघांमध्ये वादाच्या फैरी सतत झडत आहेत.