सोनू भिडे, झी मीडिया, नाशिक : शासनाने राज्यभरातील एकूण 4344 तलाठी (Talathi) पदाची भरती जाहीर केली. या परीक्षेला गुरुवार पासून सुरुवात झाली आहे. मात्र एका परीक्षा केंद्रा बाहेर हाय टेक पद्धतीन कॉपी (Hi-Tech Copy) करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर गणेश गुसिंगे या संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे. या संशयिताकडून वॉकी टॉकी, हेडफोन, टॅब, दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी तीन जणांविरुद्ध म्हसरूळ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा (Fraud) गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस करत आहेत.
तलाठी पदाची परीक्षा
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकूण 4344 पदांच्या भरतीसाठी जमावबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे यांच्या मार्फत परीक्षा घेतली जात आहे. अर्ज जास्त आल्याने हि परीक्षा टप्प्या टप्याने घेतली जात आहे. पहिल्या टप्याची परीक्षा राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये 17 ऑगस्टला विविध केंद्रांवर ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. यात नाशिक शहरातही परीक्षा घेण्यात येत होती.
संशयित आरोपीला पोलिसांनी केली अटक
नाशिक शहरातील दिंडोरी रोडवरील वेबइझी इन्फोटेक या परिक्षा केंद्रात पहिल्या टप्प्यातील तलाठी भरतीची परीक्षा (Exam) सुरु होती. यावेळी परीक्षा केंद्राच्या बाहेर असलेल्या एका दुकानात एक व्यक्ती संशयास्पद हालचाली करत असल्याचे नागरिकांना लक्षात आले. याची माहिती म्हसरूळ पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच म्हसरूळ पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. यानंतर सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतलं.
जप्त करण्यात आले साहित्य
पोलिसांनी अटक केलेल्या गणेश गुसिंगे या संशयित आरोपीची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडून वॉकी टॉकी, दोन मोबाईल, हेडफोन, श्रवणयंत्र आणि एक टॅब, असं साहित्य ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीसानी ताब्यात घेतलेल्या मोबाईल आणि टॅबमध्ये सुरु असलेल्या परीक्षेच्या प्रश्न पत्रिकेतील प्रश्नांची फोटो मिळून आले आहेत.
हायटेक पद्धतीन पुरवण्यात येत होती माहिती
तलाठी पदाच्या 4344 पदांसाठी 10 लाख 41 हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. अर्ज जास्त असल्याने नोकरी मिळविण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न आहे. मात्र नाशिकमध्ये परीक्षार्थीने हायटेक पद्धतीचा वापर करून कॉपी करण्याचा प्रयत्न केला आहे. मित्राच्या मदतीने हि कॉपी करण्यात आली आहे. परीक्षार्थी परीक्षेला बसला असताना त्याच्या कानात एक श्रवण यंत्र देण्यात आले होते. आणि त्याचा मित्र केंद्राच्या बाहेर होता. दोघांकडे स्मार्ट फोन सुद्धा होते. स्क्रीन वरील सर्व काही दिसेल अश्या पद्धतीने मोबाईल परीक्षार्थीने लपविला होता. या मोबाईलचे सर्व चित्र हे बाहेर बसलेल्या मित्राच्या मोबाईल मध्ये दिसत होते. बाहेर बसलेला मित्र हे प्रश्न बघून त्याचे उत्तर वॉकी टॉकीवरून परीक्षेला बसलेल्या मित्राला सांगत होता.
या तीन जणांवर गुन्हा दाखल
पोलिसांनी संशयित आरोपी गणेश गुसिंगे, संगीता गुसिंगे, आणि सचिन नायमाने यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. गणेश याची पोलिसांनी चौकशी केली असता संगीता गुसिंगे हिला मदत करत असल्याची माहिती त्याने दिली. तसंच सोबत सचिन नायमाने असल्याचे त्याने पोलिसांना सांगितलं. यानुसार तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून गणेश गुसिंगेला अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त किरणकुमार चौव्हाण यांनी दिली.