सागर गायकवाड, झी मीडिया
Nashik Breaking News: नाशिक शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. पंचवटी परिसरात पाच ते सहा मानवी कवट्या आणि हाडे सापडली आहेत.एका गोणीत ही हाडे आणि कवट्या भरलेल्या होत्या. अशा प्रकारे मानवी हाडे सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही हाडे येथे कोणी टाकली व या मागे नक्की कोणाचा हात आहे, हे मात्र अद्याप उघड झालेले नाहीये. मात्र अशा प्रकारे हाडे सापडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
एरंडवाडी येथील मंदिराच्या परिसरात मानवी हाडांनी भरलेली गोणी सापडली होती. सध्या पोलिसांनी ही गोणी ताब्यात घेतली आहे. सदर कवट्या आणि हाडे अघोरी विद्या करण्यासाठी आणले असल्याचा पोलिसांना संशय होता. मात्र भर वस्तीत आढळलेल्या मानवी कवट्यांमुळे चर्चांना उधाण.दरम्यान पोलिसांनी ही हाडे आणि कवटी खरी आहे का याची तपासणीदेखील करुन घेतली होती. मात्र, गोणीत सापडलेल्या मानवी हाडे आणि कवट्या खऱ्या नसल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी मंदिराच्या पुजाऱ्याला व इतर नागरिकांना तपासासाठी बोलावून घेत घटनेची चौकशी केली
पोलिसांनी गोणीत सापडलेल्या मानवी हाडे आणि कवट्या खऱ्या आहेत का याची तपासणी केल्यानंतर ही हाडे आणि कवट्या प्लास्टिकच्या असल्याचे निप्षन्न झाले आहे. त्याचबरोबर नाशिकच्या पंचवटी हद्दीत अघोरी विद्या करणाऱ्या भोंदू बाबा पंचवटी पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.भोंदू बाबाची कसून चौकशी सुरू असल्याची पोलिसांनी दिली माहिती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानवी हाडे आणि कवटी प्रकरणी एका भोंदू बाबाला ताब्यात घेतलं आहे. हा भोंदू बाबा एरंडवाडी येथील कालिकामाता मंदिर परिसरात अघोरी कृत्य आणि जादुटोणा पूजा करतो, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. सध्या या भोंदू बाबाला ताब्यात घेण्यात आलं आहे, अशी माहिती मधुकर कड वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांनी दिली आहे.