मुक्या चोराची फिल्मी स्टाईल चोरी, भर दिवसा घरात घुसून चोरले मोबाईल

थेट घरात घुसून 10 ते 12 मोबाईल चोरी करण्यात आले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 

Updated: May 27, 2024, 05:09 PM IST
मुक्या चोराची फिल्मी स्टाईल चोरी, भर दिवसा घरात घुसून चोरले मोबाईल title=

Nashik mobile phones theft : नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोबाईल चोरांचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे. नाशिकमधील सिडको परिसरात असलेल्या पवन नगर, उत्तम नगर आणि सावता नगर भागात थेट घरात घुसून 10 ते 12 मोबाईल चोरी करण्यात आले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 

नाशिकच्या सिडको परिसरातील पवन नगर, उत्तम नगर, सावता नगर भागात गेल्या 15 दिवसांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. नाशिकच्या पवन नगर आणि उत्तम नगर परिसरात सकाळच्या सुमारास या चोरांपैकी एक व्यक्ती हा मुका असल्याचे नाटक करुन घुसखोरी करतो. त्यानंतर तो काहीतरी कारण सांगत घरात घुसून घरातील कुटुंबियांचे लक्ष नसताना मोबाईल चोरतो. अशाप्रकारे आतापर्यंत या परिसरात राहणाऱ्या 10 ते 12 जणांचे मोबाईल चोरी करण्यात आले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. या परिसरात पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. 

अंबड पोलिसात तक्रार दाखल

सिडको भागातील अनेक घरे एकमेकांना लागून आहेत. त्यामुळे या चोरीच्या घटना घडत आहेत. विशेष म्हणजे चोर थेट घरात घुसून मोबाईल चोरुन नेत आहे. यातील काही ठिकाणी मोबाईल चोरताना चोर सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. तरीही हा चोर पोलिसांना सापडत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याबाबत काही नागरिकांनी अंबड पोलिसात तक्रारी केल्या आहेत. 

सर्वत्र चोरट्यांची दहशत

आतापर्यंत या परिसरातून 20 ते 50 हजारांचे मोबाईल चोरी झाले आहेत. यामुळे सर्वत्र चोरट्यांची दहशत पाहायला मिळत आहे. हे चोर भर दिवसाही घरात घुसून मोबाईल चोरले जात आहेत. आता पोलिसांनी नाशिकमधील चोरी करणारा हा व्यक्ती आढळल्यास पोलिस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.