योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : नगरपरिषद तलाव परिसरात फिरायला गेलेल्या तीन जणांचा तळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना नाशिकच्या (Nashik News) इगतपुरीमध्ये (Igatpuri) घडलीय. तलाव परिसरात फिरायला गेले असताना तिघांनाही पोहण्याचा मोह आवरला नाही. मात्र पोहोण्याच्या नादात तलावात उतरलेल्या तिघांचा बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच बचावासाठी स्थानिकांनी धाव घेतली. मात्र तिघांनाही वाचवण्यात यश आले नाही.
इगतपुरी शहरातील नगरपरिषद तलाव येथे फिरण्यासाठी हे तिघेही दुपारच्या सुमारास गेले होते. यावेळी त्यांनी तलावात अंघोळ करण्यासाठी पाण्यात उतरण्याचा निर्णय घेतला. तिघांपैकी दोघांनी तलावात उडी घेतली. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडू लागले. दोघांना बुडताना पाहून तिसऱ्याने देखील पाण्यात उडी घेतली मात्र तोही बुडाला. मृतांमध्ये दोन सख्या भावासह त्यांच्या मामाचाही समावेश आहे. घटनेची माहिती स्थानिकांना समजताच त्यांनी नगरपरिषद कर्मचारी, जनसेवा प्रतिष्ठान कार्यकर्त्यांनी मदतीसाठी धाव घेतली होती. मात्र तिघांनाही वाचवण्यात यश आले नाही. बुडणाऱ्या भाच्यांना पाहून मामाने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याचाही या घटनेत मृत्यू झाला आहे.
दरम्यान, तिघांनाही तलावातून बाहेर काढण्यात आल्यानंतर इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. घटनेची माहिती मिळताच अनेकांनी ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली होती. मात्र यामध्ये तिघांचाही मृत्यू झाला. दुसरीकडे
व्हेंटिलेटर आणि आयसीयूची सुविधा नसल्यामुळे यापैकी एकाचा मृत्यु झाल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. याचा निषेध म्हणून इगतपुरी ग्रामीण रुग्णालय समोर कुटुंबीयांनी ठिय्या आंदोलन देखील केले. कुटुंबियांच्या आंदोलनामुळे परिसरात काहीवेळ तणावाच वातावरण निर्माण झाल होते.
मासेमारी करायला गेलेले दोघे सख्खे भाऊ बुडाले
इगतपुरीमध्ये दुसरीकडे दोनच दिवसांपूर्वी देवळे परिसरात नदीपात्रात मासेमारी करायला गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला होता. तब्बल तीन दिवसांनी दोघांचे मृतदेह सापडले होते. आवळखेड येथील पंकज काशिनाथ पिंगळे, कृष्णा काशिनाथ पिंगळे हे दोघेही दारणा नदी पात्रात मासेमारी करण्यासाठी गेले होते.