ईदच्याच दिवशी कुरेशी कुटुंबियावर काळाचा घाला; भीषण अपघातात पितापुत्र ठार

Nashik News : हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये बाईकचा अक्षरक्षः चुराडा झाला आहे. ट्रकने धडक दिल्यानंतर बाईकवरील दोघेही रस्त्यावर फेकले गेले. मात्र डोक्याला गंभीर जखम झाल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे

आकाश नेटके | Updated: Apr 23, 2023, 09:22 AM IST
ईदच्याच दिवशी कुरेशी कुटुंबियावर काळाचा घाला; भीषण अपघातात पितापुत्र ठार title=

चेतन कोळस, झी मीडिया, नाशिक : जगभरात निवारी मोठ्या उत्साहात ईद (Eid 2023) साजरी करण्यात आली. मात्र नाशिकच्या (Nashik News) येवल्यात ईदच्या दिवशीच एका कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. ईदच्याच दिवशी ट्रकने दिलेल्या धडकेत पिता पुत्राचा मृत्यू झाल्याची घटना चांदवड (Chandwad) तालुक्यात घडली आहे. पाठीमागून येणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी (Nashik Police) ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

चांदवड तालुक्यातील शिंगवे शिवारात लासलगाव-मनमाड रोडवर हा भीषण अपघात झाला. मनमाडच्या आययुडीपी येथे राहणारे यासीन इस्माईल कुरेशी (47) आणि हुजेब यासीन कुरेशी (20) हे दुचाकीने लासलगाव-मनमाड रस्त्याने मनमाडकडे जात होते. त्याचवेळी चांदवड तालुक्यातील शिंगवे शिवाराजवळ असलेल्या खडीक्रशर समोर मागून येणाऱ्या ट्रकने कुरेशी यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की इस्माईल आणि हुजेब दोघेही रस्त्यावर फेकले गेले. या अपघातात दोघांच्याही डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच चांदवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. पिता पुत्राच्या मृत्यूची बातमी समजताच कुरेशी यांच्या कुटुंबियांनी रुग्णालयात धाव घेतली. ईदच्याच दिवशी अपघातात दोघांचा जीव गेल्याने मनमाडमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

पुणे बंगळुरु महामार्गावार भीषण अपघाता; चौघांचा मृत्यू 

दुसरीकडे,  पुणे बंगळुरु महामार्गावर भीषण अपघात झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे. पुणे - बंगळुरु महामार्गावर मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास नऱ्हे आंबेगाव परिसरात असणाऱ्या स्वामी नारायण मंदिराजवळ ट्रक व खाजगी बसची जोरदार धडक झाली. यामध्ये चौघांचा मृत्यू झाला तर 22 जण जखमी झाले आहेत. खासगी ट्रॅव्हलच्या बसला ट्रकने धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. ही बस साताऱ्यावरुन मुंबईकडे येत होती. ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर आली असून या अपघातामध्ये त्याचाही मृत्यू झाला आहे. अपघातानंतर पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या जवानांनी जखमींना बाहेर काढण्यात आले आहे.

अपघातानंतर महामार्गावर उलटला ट्रक

दरम्यान, पुणे नाशिक महामार्गावरील आळेफाटा येथे मध्यरात्री मालवाहू ट्रक आणि पिकअप यांच्यात समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झालाय. या अपघातानंतर मालवाहू ट्रक थेट महामार्गावरच उलटला आणि ट्रकला भीषण आग लागली. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला. आळेफाटा पोलिसांच्या मदतीने तातडीने आगीवरती नियंत्रण मिळविण्यात यश आले. मात्र अपघातामुळे महामार्गावर तब्बल दोन तास वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.