Navi Mumbai Crime News : राज्यभरात लाखो महिलांना सरकारच्या लाडकी बहिण योजनेचा लाभ घेतला आहे. रक्षाबंधनाआधीच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मानधन एकत्रितरित्या बँक खात्यावर जमा झाले आहेत. 2 महिन्यांचे 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले आहेत. अजूनही अनेक महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करत आहेत. नवी मुंबईत मात्र एक विचित्र प्रकार समोर आला आहे. एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या नावे लाडकी बहिण योजनेचे 30 अर्ज भरले आहत. मात्र, एका नंबरमुळे तो फसला आहे.
लाडकी बहीण योजनेत एका भामट्यानं फसवणूक केल्याचं समोर आलंय. एक बँक अकाऊंट 30 वेगेवगळ्या आधार कार्डशी जोडून लाडकी बहीण योजनेत फसवणूक केल्याचा आरोप होत आहे. खारघरमधील महिला पूजा महामुनी यांच्या आधारकार्डचा गैरवापर करून भामट्यानं फसवणूक केलीय. त्याची तक्रार पनवेल तहसीलदारांकडे करण्यात आलीय.. अर्ज वारंवार भरूनही दाखल होत नसल्यानं त्यांनी याची तक्रार स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांकडे केलीय.. त्यानंतर भामट्यानं फसवणूक केल्याचं समोर आलंय...साताऱ्यातील जाधव नावाच्या व्यक्तीनं पत्नीच्या नावे 1 नव्हे तर 30 अर्ज भरल्याचं समोर आलंय..
खारघर मधील महिला पुजा प्रसाद महामुनी यांच्या आधारकार्डचा गैरवापर झाल्याचे समोर आल्या नंतर पनवेल तहसिल कार्यालयात ही तक्रार दाखल केली आहे. महामुनी यांचा अर्ज वारंवार भरून देखील सबमिट होत नसल्याने त्यांनी पनवेल मधील भाजपचे माजी नगरसेवक निलेश बाविस्कर यांच्याकडे तक्रार केली. यानंतर निलेश बाविस्कर यांनी शोध घेतला असता पुजा महामुनी यांचा अर्ज आधीच अप्रूव्हड झाले असल्याचे समोर आले. मात्र, त्यांच्या आधारकार्डला सातारा येथील जाधव नामक व्यक्तिचा मोबाईल नंबर ॲड झाला होता. याबाबत अधिक माहिती मिळवली असता जाधव नावाच्या या व्यक्तीने आपल्या पत्नीच्या नावे एक नव्हे तब्बल 30 अर्ज भरल्याचे दिसून आले. यानंतर सदरची तक्रार पनवेल तहसिलदारांकडे करण्यात आली असून तहसीलदारांनी ही तक्रार रायगड जिल्हाधिकारी यांच्या कडे पाठवली असून याप्रकरणात तपास सुरू असल्याची माहिती तहसीलदार विजय पाटील यांनी दिली.
जुलै 2024 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी अधिवेशनात केली होती. दरवर्षी योजनेसाठी 46 हजार कोटीचा निधी उपलब्ध केला जाणार आहे. 21 ते 60 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये मिळत आहेत. ज्यांच्या कुटुंबाचं एकत्रित उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ घेता येतो.