लोकल प्रवास सुखाचा होणार, ट्रान्सहार्बरवर सुरू होतेय नवीन स्थानक, 12 जानेवारीपासूनच करा प्रवासाला सुरुवात

Digha Gaon Railway Station: दिघा गाव रेल्वे स्थानक लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. या लोकलमुळं प्रवाशांचा त्रास वाचणार आहे.   

मानसी क्षीरसागर | Updated: Jan 11, 2024, 05:06 PM IST
 लोकल प्रवास सुखाचा होणार, ट्रान्सहार्बरवर सुरू होतेय नवीन स्थानक, 12 जानेवारीपासूनच करा प्रवासाला सुरुवात title=
Navi mumbai pm modi inaugurate digha gaon railway station on trans harbour line on 12 jan

Digha Gaon Railway Station: पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यावेळी मुंबई व नवी मुंबई लगतच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण मोदींच्या हस्ते होणार आहे. 12 जानेवारी रोजी मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड, तसंच, खारकोपर-उरण रेल्वे मार्गाचे उद्घाटन होत आहे. त्याचबरोबर, प्रवाशांचा लोकल प्रवास सुखाचा व्हावा यासाठी ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर आणखी एक स्थानक उभारण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हस्ते या स्थानकाचे लोकार्पण होणार आहे.  

ठाणे- वाशी ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर दिघा गाव या नव्या रेल्वे स्थानकाची भर पडणार आहे. या रेल्वे स्थानकामुळं प्रवास सुखाचा होणार आहे. ठाणे ते ऐरोली स्थानकादरम्यान दिघा हे स्थानक उभारण्यात आले आहे. 12 जानेवारी रोजी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते या स्थानकाचे उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान मोदींच्या यांच्या दौऱ्याची रुपरेखा समोर आली आहे. यात, ठाणे-वाशी/पनवेल ट्रान्स हार्बर मार्गावरील नवीन उपनगरीय स्थानक 'दिघा गाव' तसेच खार रोड आणि गोरेगाव रेल्वे स्थानकादरम्यान नवीन सहाव्या रेल्वेमार्गाचा समावेश आहे. या प्रकल्पांमुळे मुंबईतील हजारो प्रवाशांचा दैनंदिन रेल्वेप्रवास सुलभ होणार आहे.

दिघा गाव रेल्वे स्थानकाचे लोकार्पण 6 एप्रिल रोजी होणार होते. मात्र काही कारणास्तव हे लोकार्पण रखडले होते. मात्र, आता या स्थानकातील कामं पूर्ण झाली असून प्रवाशांसाठीही सज्ज आहे. विटावा, दिघा येथील रहिवाशांसाठी हे स्थानक खूपच फायदेशीर ठरणार आहे. या परिसरातील रहिवाशांना लोकल पकडण्यासाठी ऐरोली किंवा ठाणे स्थानक गाठावे लागते. मात्र, आता हे स्थानक सुरू झाल्यानंतर प्रवाशांचा त्रास वाचणार आहे. 

दिघा गाव रेल्वे स्थानकासाठी 200 कोटीं रुपये खर्च करण्यात आले आहेत. या स्थानकामुलं कल्याण ते नवी मुंबई प्रवास सुखाचा होणार आहे. दिघा गाव रेल्वे स्थानकात ट्रान्सहार्बर रेल्वे मार्गावरील सर्व लोकल या स्थानकात थांबणार आहेत. स्थानकावर दोन फलाट असून त्यांची लांबी 270 मीटर आणि रुंदी 12 मीटर असणार आहे. त्याचबरोबर स्थानकात लिफ्ट आणि चार सरकते जिने असणार आहे. 

कळवा- ऐरोली उन्नत प्रकल्पाचा पहिला टप्पा म्हणजे दिघा गाव आहे. तर, दुसऱ्या टप्प्यात कळवा एलेव्हेटेड रेल्वे स्थानक बांधले जाणार आहे. हा मार्ग दिघा गाव रेल्वे स्थानकाचा जोडणार आहे. कल्याण, अंबरनाथ आणि बदलापूरहून येणार्‍या प्रवाशांना नवी मुंबईला जाण्यासाठी ठाण्याहून ट्रेन पकडावी लागते. हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांना कळवा स्थानकातून नवी मुंबईसाठी लोकल मिळणार आहे. त्यामुळं ठाणे स्थानकातील गर्दीदेखील कमी होणार आहे.