Ajit Pawar on Sharad Pawar Retirement: शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं (NCP) अध्यक्षपद सोडणार असल्याची घोषणा केल्यानंतर कार्यकर्त्यांकडून तुफान गोंधळ घातला जात आहे. जोपर्यंत शरद पवार निर्णय मागे घेत नाहीत तोपर्यंत आम्ही सभागृह सोडणार नाही असा निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे. दरम्यान यानंतर अजित पवारांनी (Ajit Pawar) कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी समिती जो निर्णय घेईल तो शरद पवारांना मान्य असणार असल्याचं स्पष्ट केलं.
"समिती जे काही ठरवेल ते शरद पवारांना मान्य असेल असं शरद पवारांनी सांगितलं आहे. कमिटीत बाहेरचे लोक नाहीच. समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा परिवारच आहे. तिथे मी, सुप्रिया आणि इतर आहेत. साहेबांना तुम्ही जी काही भावनिक साद घातली आहे, ती आमच्या लक्षात आली आहे," असं अजित पवार यांनी सांगितलं आहे.
शरद पवारांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना अश्रू अनावर झाले. त्यांनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा अशी विनंती यावेळी त्यांनी केली. तुम्ही आम्हा सर्वांचे राजीनामे घ्या, हवं तर नव्या लोकांच्या हातात पक्ष द्या, पण प्रमुख पदावरुन बाहेर जाणं हे कोणाच्याही हिताचं नाही. आम्हाला तुमच्या छायेत काम करण्याची सवय लागली आहे. तुम्ही थांबलात तर आम्ही थांबतो असं सांगताना जयंत पाटील यांनी अश्रू आवरत नव्हते.
अनिल देशमुख यांनीही यावेळी आम्हाला पोरकं करु नका. आपल्या निर्णयाचा फेरविचार करा अशी विनंती केली.
या वयात तुम्ही कोणापेक्षाही जास्त काम करता. आम्हाला तुमच्या वयाचा मुद्दा पटलेला नाही. देशालाही तुमच्या नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळे तुमचा हा निर्णय कोणालाही मान्य होणार नाही. त्यामुळे आपण राजीनामा मागे घ्यावा अशी मी विनंती करतो. आयुष्य़भर आम्ही तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे वागलो आहोत. आम्ही तुम्हाला बाजूला होऊ देणार नाही. कमिटी वैगेरे आम्हाला मान्य नाही. तुम्हीच आमचे नेते आणि तुम्हीच आमची कमिटी असं छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितलं.
"एक वेळ अशी आली..घाणेरडे आरोप..प्रत्यारोप..राजकारण याचा उबग येऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीदेखील शिवसेना प्रमुखपदाचा राजीनामा दिला होता. शरद पवार यांनी तेच केले आहे. जनतेच्या रेट्यामुळे बाळासाहेबांना राजीनामा मागे घ्यावा लागला. शरद पवार हे देशाच्या राजकारणाचे आणि समाजकारणाचे श्वास आहेत," असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं आहे.
एक वेळ अशी आली..घाणेरडे आरोप..प्रत्यारोप..राजकारण याचा उबग येऊन शिवसेना प्रमुख बालासाहेब ठाकरे यांनी देखील शिवसेना प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता.शरद पवार यांनी तेच केले आहे.
जनतेच्या रेट्या मुळे बाळासाहेबांना राजीनामा मागे घ्यावा लागला.शरद पवार हे देशाच्या राजकारणाचे आणि… pic.twitter.com/YwVVgrrWiN— Sanjay Raut (@rautsanjay61) May 2, 2023