शरद पवारांनी वयाच्या 38 व्या वर्षी वेगळी चूल मांडत बंड केलं, मात्र आम्हाला 60-62 वर्षं वाट पाहावी लागली अशी टीका करणाऱ्या अजित पवारांना शरद पवारांनी उत्तर दिलं आहे. पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवारांनी आमच्या काळात चर्चा करुन निर्णय घेतले जात होते. निर्णय घेतल्यानंतर त्यामध्ये तक्रार करण्यासाठी जागा नसायची असं म्हटलं आहे. तसंच पक्षाची निर्मिती कोणी केली? पक्षाचे संस्थापक कोण आहेत? हे लोकांना माहिती आहे असा टोलाही त्यांनी लगावला.
अजित पवारांनी बारामतीत शरद पवारांवर टीका केली होती. शरद पवारांनी वयाच्या 38 व्या वर्षी वेगळी चूल मांडत बंड केलं, मात्र आम्हाला 60-62 वर्षं वाट पाहावी लागली होती. आता तरी आम्हाला काम करु द्या. आम्ही थांबा, आम्हाला काम करु द्या अशी विनंती करत होतो. आता सर्व कार्यकर्ते, आमदारांनी माझं ऐकून, माझी साथ द्यावी असं आवाहनच अजित पवारांनी केलं होतं.
याबद्दल विचारण्यात आलं असता शरद पवार म्हणाले की, "मागील 10 ते 15 वर्षांपासून बारामती आणि तेथील कामात मी लक्ष्य घातलेलं नाही. पंचायत समिती, साखर कारखाना, अन्य संस्थांवरील पदावर कोणी जावं? कोणी त्या ठिकाणची जबाबदारी घ्यावी? त्यासंबंधी एकही निर्णय मी घेतलेला नाही. नवीन पिढीने पुढे येऊन त्या जबाबदाऱ्या घ्याव्यात असं मला वाटतं. त्यामुळे गेल्या 10 किंवा त्यापेक्षा जास्त वर्षं मी एकाही गोष्टीत लक्ष दिलं नसेल तर याचा अर्थ मी अडचण आणण्याची भूमिका घेतलेली नाही".
सर्वांना सोबत घ्यावं, परिसराचा नावलौकिक वाढेल याची काळजी घ्यावी, अधिक लक्ष घालावं यात माझं दुमत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. माझा पक्ष म्हणून सर्व राज्य आणि देशात नव्या लोकांना प्तोत्साहन देण्याची काळजी मी नेहमीच घेतली असंही ते म्हणाले.
"आम्ही केलं ते बंड नव्हतं. आमच्या काळात चर्चा करुन निर्णय घेत होतो. यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नेते. होते. त्यांची विचारधारा काय आहे हे आम्हाला माहिती होतं. आम्ही चर्चा करुन निर्णय घेतला होता. निर्णय घेतल्यानंतर त्यात कोणतीही तक्रार नसायची. पक्ष, लोकांनी पाठिंबा दिला. पक्षाची निर्मिती. संस्थापक कोण होते हे लोकांना माहिती आहे. त्यावर अधिक भाष्य करण्याची गरज नाही," असं सांगत त्यांनी जास्त भाष्य करण्यास नकार दिला.
"इतके वर्ष बाकीच्यांच तुम्ही खूप ऐकलंत. आता इथून पूढे फक्त माझे ऐका, बाकी कुणाचं ऐकू नका. तुम्ही मला आजपर्यंत भरभरून आशिर्वाद दिले आहेत. आता तुम्हाला एक निर्णय घ्यावा लागेल. इकडं पण, तिकडं पण चालणार नाही. ज्यांना माझ्याकडे यायचे आहे त्यानी यावं. मी जे काही करेन ते बारामतीकरांच्या हिताचेच करेन. मी 60 वर्षांचा झाल्यावर वेगळी भूमिका घेतली. काहींनी 38 व्या वर्षी वेगळी भूमिका घेतली होती. यशवंतराव चव्हाण यांचा याला विरोध होता. वसंतदादा पाटील हे चांगलं नेतृत्व होते. तरी त्यांना बाजूला करण्यात आलं आणि जनता पक्षालाबरोबर घेऊन सत्ता स्थापन करण्यात आली", असं अजित पवार म्हणाले होते.