Sanjay Raut : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीने (ED)नऊ तासांच्या चौकशीनंतर अखेर ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबईतल्या पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांची रविवारी सकाळी 7.30 वाजल्यापासून त्यांच्या भांडूपमधल्या घरी चौकशी सुरु होती.
त्यानंतर आता राज्यभरातून प्रतक्रिया येत आहेत. संजय राऊतांवरील कारवाईनंतर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ईडी केंद्र सरकारची गुलाम आहे. त्यातून एकएकेला ठरवून टार्गेट केले जात आहे, असे अरविंद सावंत यांनी म्हटले आहे.
काल राज्यपालांनी महाराष्ट्रातील मराठी जनतेचा अपमान केला. राज्यपालांनी केलेल्या वक्तव्यातून दोन गोष्टी साधण्याचा प्रयत्न केला. एक म्हणजे मराठी माणसामध्ये दुही आणि दुसरं म्हणजे हिंदूमध्ये दुही निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, असे खासदार अरविंद सावंत यांनी म्हटले आहे.
राज्यपालांच्या वक्तव्यानंतर उभा महाराष्ट्र पेटून उठला होता. मग आजचा मुहूर्त साधून त्यांनी संजय राऊतांच्या घरी धाड टाकली. यामध्ये सुद्धा कपटीपणा केला आहे. भ्रष्टाचाऱ्यांच्या भ्रष्टाचाराला भाजपमध्ये आल्यानंतर पावन केले जाते, असेही अरविंद सावंत म्हणाले.
ईडीच्या प्रश्नाला उत्तर देणं हाच त्याच्यावरचा मार्ग - जयंत पाटील
"हे काय नवीन राहिलेले नाही. सुप्रीम कोर्टाने ईडीच्या अधिकारांना बळकटी दिली आहे. कोणताही दोष कशातही आढळला तर ईडी त्यात कारवाई करु शकते असं आता चित्र आहे. ईडीचे अधिकार सुप्रीम कोर्टाने वाढवून दिल्याने त्यांच्या प्रश्नाला उत्तर देणं हाच त्याच्यावरचा मार्ग आहे," असे राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी म्हटले आहे