प्रविण तांडेकर, झी मीडिया, भंडारा : बहिणीची भेट घेऊन गावी परतताना रानडुकराने (Wild boar) दुचाकीला धडक दिल्याने दोन भावांचा गंभीर अपघात झाल्याची घटना भंडाऱ्यामध्ये (bhandra) घडली आहे. या दुर्दैवी घटनेत लहान भावाचा मृत्यू झाला आहे तर मोठा भाऊ गंभीर जखमी झाला आहे.
भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील पाथरी शिवारीतल पॉवर हाऊस जवळ रात्रीच्या सुमारास ही घडली. दुचाकीवरून पडताना डोके दगडावर आदळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. प्रदीप गोपीचंद नागपुरे (22) असे मृताचे नाव आहे. तर दिलीप गोपीचंद नागपुरे (35) हे जखमी झाले आहेत. दोघेही खापा मोहाडी ता. तुमसर येथे राहणारे होते.
खापा मोहाडी येथून दोघे भाऊ दुचाकीने आष्टी येथे बहीणीला भेटण्यास गेले होते. सायंकाळी दोघेही आष्टीवरून नाकडोंगरी ते कवलेवाडा मार्गे जात असताना पाथरी पॉवर हाऊसजवळ त्यांच्या दुचाकीला रस्त्याच्या कडेने धावत आलेल्या रानडुकराने दुचाकीला जबर धडक दिली.
रानडुकराच्या धडकेत दोघेही दुचाकीवरुन खाली कोसळले. रस्त्याच्या कडेला असलेल्या दगडावर प्रदीपचे डोके आदळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा मोठा भाऊ गंभीर जखमी झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी जखमीला उपचारांसाठी तुमसर उपजिल्हा रुग्णालयात हलवले. दरम्यान, रानडुकराच्या धडकेत मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाच्या परिवाराला वन विभागाने तात्काळ आर्थिक मदत करण्याची मागणी केली जात आहे.