महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी करणाऱ्या पासवान यांना रोहित पवारांनी खडसावलं

मुलींचं लैंगिक शोषण होत असताना...   

Updated: Sep 14, 2020, 07:21 AM IST
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी करणाऱ्या पासवान यांना रोहित पवारांनी खडसावलं   title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : महाराष्ट्रात राष्ट्परती राजवट लागू करण्यात यावी अशी मागणी लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष आणि खासदार चिराग पासवान यांनी केली. उत्तर भारतीयांना महाराष्ट्रात लक्ष केलं जात आहे, कंगनाचं ऑफिस तोडलं, माजी नौदल अधिकाऱ्यांना मारहाण करण्यात आली आणि आता मारहाण करणाऱ्यांना ताबडतोब जामिनही मिळाला. त्यामुळं राज्यातील जनतेला सरकारचंच भय नसेल तर, राष्ट्रपती शासनाशिवाय दुसरा पर्याय नाही, अशी स्पष्ट भूमिका पासवान यांनी मांडली. 

राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी करणाऱ्या पासवान यांच्या या भूमिकेला सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचीही किनार होती. याच धर्तीवर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी करणाऱ्या चिराग पासवान यांना राषट्रवादीचे आमदार Rohit Pawar रोहित पवार यांनी थेट शब्दांत उत्तर देत बिहारमध्ये अशी मागणी का केली नाही असा प्रश्नार्थक सूर आळवला. 

एका ट्विटच्या माध्यमातून पवार यांनी पासवान यांना उद्देशून बिहारमधील गुन्हेगारीचं वाढतं प्रमाण हे आकडेवारीसह मांडत वास्तव पुढे आणलं. 'चिरागजी आपण महाराष्ट्राच्या कायदा आणि सुव्यवस्थेबाबत तुम्ही चिंतातूर आहात आणि राज्यात राष्ट्रपती राजवटीचीही मागणी केली असं ऐकलं. आता तुम्हाला कायदा आणि सुव्यवस्थेची इतकीच चिंता आहे, तर मग बिहारमध्येही तुम्ही अशी मागणी का केली नाही? जेव्हा मुजफ्फरपूर निवारागृहामध्ये मुलींचं लैंगिक शोषण करण्यात आलं होतं. अशा घटना इतरही जिल्ह्यांमध्ये घडल्याचं तुम्ही म्हटलं होतं तेव्हा मात्र आपण नितीश कुमार यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली नाही', असं लिहित बिहारची राजधानी पाटणा ही देशातील खुनांच्या घटनांमध्ये १९ शहरांमध्ये पहिल्या स्थानावर असल्याची धक्कादायक बाब त्यांनी अधोरेखित केली. 

 

हुंडाबळी, कार्यकर्त्यांच्या हत्या, भूखंड माफियांकडून नागरिकांना मारहाण, घरांची जाळपोळ अशा घटना बिहारमध्ये सर्रास घडत असल्याचं म्हणत येथे सर्वसामान्यांची नेमकी काय अवस्था असेल असा चिंतेचा सूर त्यांनी आळवला. आपण आपल्या राजकीय वाटचालीसाठी सोप्या मार्गाचा अवलंब करत आहात, असं म्हणत राजकीय लाभासाठीच महाराष्ट्रावर चिखलफेक करत आहात, असा आरोप पवार यांनी चिराग पासवान यांच्यावर केला.