गुंड गजा मारणेची भेट का घेतली? निलेश लंकेंनी अखेर केलं स्पष्ट, '4 ते 5 जणांचं टोळकं...'

नवनिर्वाचित खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी पुण्यातील कुप्रसिद्ध गुंड गजा मारणेची (Gaja Marne) भेट घेतल्याने वादात अडकले आहेत. गजा मारणेने त्यांचा सत्कार केल्याचा व्हिडिओ व्हायरल (Viral Vidoe) झाला आहे. दरम्यान निलेश लंके यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे.  

शिवराज यादव | Updated: Jun 14, 2024, 03:58 PM IST
गुंड गजा मारणेची भेट का घेतली? निलेश लंकेंनी अखेर केलं स्पष्ट, '4 ते 5 जणांचं टोळकं...' title=

शरद पवार गटाचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी पुण्यातील कुप्रसिद्ध गुंड गजा मारणेची (Gaja Marne) भेट घेतल्याने वादात अडकले आहेत. गजा मारणेने त्यांचा सत्कार केल्याचा व्हिडिओ व्हायरल (Viral Vidoe) झाला आहे. यानंतर विरोधक त्यांच्यावर टीका करत असताना निलेश लंके यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. आपली अपघाताने भेट झाली असा दावा निलेश लंके यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केला आहे. 

लोकसभा निवडणुकीआधी पार्थ पवार यांनी मारणेची भेट घेतली होती. यानंतर यावरुन टीका करण्यात आली होती. त्यावेळी अजित पवारांनीही ती भेट म्हणजे, चूक झाली होती असं स्वतः कबूल केलं होत. त्यानंतर आता निलेश लंके यांच्या भेटीमुळे पुन्हा एकदा तीच चूक झाल्याची टीका होती आहे. निलेश लंके यांनी यावर स्पष्टीकरण देताना नेमकं काय झालं याची माहिती दिली आहे. 

"दिल्लीला माझ्या काही कागदपत्रांची पूर्तता करायची होती. ती पूर्तता करुन पुणे विमानतळावर उतरलो होतो. विमानतळावर उतरल्यानंतर मला काही भेटी द्यायच्या होत्या. माझे पवार नावाचे सहकारी मित्र असून, त्यांचं कॅन्सरने निधन झालं. ते चांगले पैलवान आणि संघटक होते. कॅन्सरमुळे निधन झालं असल्याने मी त्यांच्या कुटुंबाला सांत्वनपर भेट देण्यासाठी गेलो होतो," अशी माहिती निलेश लंके यांनी दिली.

पुढे ते म्हणाले की, "प्रवीण नावाच्या कार्यकर्त्याच्या घऱी भेट देण्यासाठी गेलो होतो. घऱातून बाहेर निघाल्यानंतर रस्त्याने जात असताना समोर 4 ते 6 लोकांचं टोळकं उभं होतं. त्यांनी मला हात दाखवला. राजकारणात, समाजकार्यात काम करणाऱ्या माणसाला हात दाखवल्यावर थांबावं लागतं. त्यांनी चहा पिण्यासाठी जाऊ असं सांगितलं. मी नकार दिला असता त्यांनी समोरच घर असल्याचं सांगितलं. आम्ही चहा घेतल्यानंतर त्यांनी माझा सत्कार केला. मला तोपर्यंत ती व्यक्ती कोण आहे, त्याची पार्श्वभूमी काय आहे हे माहिती नव्हतं". 

बाहेर पडल्यानंतर मला तासाभराने फोन आला. यानंतर मला त्याची माहिती मिळाली. ही अपघाताने भेट झाली आहे. मला पार्श्वभूमी माहिती असती तर ही चूक केली नसती असंही निलेश लंके यांनी दिली आहे. 

गजा मारणे कोण आहे?

गजा उर्फ गजानन मारणे हा पुण्यातील कुप्रसिद्ध गुंड असून त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे असून मारणे टोळीच गजा मारणे मुख्य म्होरक्या आहे. गजानन मारणेचे मुळ गाव मुळशी तालुक्यात आहे. पुण्यात निलेश घायवळ आणि गजा मारणे यांच्यातील टोळीयुद्ध सर्व पुणेकरांना माहीत आहे. पप्पू गावडे आणि अमोल बधे हत्या प्रकरणामध्ये गजा मारणेला अटक झाली होती. तीन वर्ष तो येरवड्यामध्ये होता. मारणे आणि मोहोळ टोळीचा पुण्यात दबदबा असून दोन्ही टोळ्यांचे म्होरके शरद मोहोळ आणि गजानन मारणे यांचे एकत्र फोटो सोशल मीडियावर आहेत.