मुस्तान मिर्झा, झी मीडिया उस्मानाबाद: कळंब मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी गृहमंत्री पदमसिंह पाटील यांचे सुपुत्र राणाजगजितसिंह पाटील हे भाजपच्या संपर्कात असून लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात सुरू आहे. यापूर्वीही अशा चर्चा सुरू होत्या मात्र राणा पाटील यांनी ईमेलद्वारे या चर्चेचं खंडन केलं होतं. मी सध्यातरी पक्ष सोडणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
मात्र, कृष्णा- मराठवाडा पाटबंधारे प्रकल्प, कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाला निधी दिल्याबद्दल आणि नाबार्डकडून कर्ज घेण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्याबद्दल त्यांनी नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे आपल्या फेसबुक पेजवरून आभार मानले होते. ही पोस्ट सध्या जिल्ह्याभरात व्हायरल होत असून पुन्हा एकदा राणा पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला उधाण आले आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत राणा पाटील भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. भाजपात गेल्यास ते उस्मानाबाद की तुळजापूर या कोणत्या मतदारसंघातुन लढणार? याबद्दलही लोकं तर्कवितर्क लावत आहेत.
राणा जगजितसिंह पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातेवाईक आहेत. डॉ. पदमसिंह पाटील हे काँग्रेसच्या काळापासून शरद पवार यांच्यासोबत आहेत. जर राणा पाटील हे भाजपात गेले तर शरद पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
राणा जगजितसिंह पाटील यांची जिल्ह्यात चांगलीच पकड आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका, बाजार समिती अशा स्थानिक स्वराज्य संस्थांवर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. त्यामुळे राणा पाटील यांचा भाजपात प्रवेश झाला तर भाजपाची ताकद जिल्ह्यात वाढेल.
जिल्ह्यातील भाजपात घुसमट
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेनंतर जिल्ह्यातील भाजपात घुसमट सुरू झाली आहे. जिल्ह्यातील भाजपचे मोठे नेते आणि एस.पी साखर कारखान्याचे संस्थापक- चेअरमन सुरेश पाटील यांनी राणा पाटील भाजपात आल्यास मी पक्ष सोडणार असल्याची भूमिका घेतली आहे. "महायुतीची सत्ता पुन्हा एकदा येणार, आमदार व मंत्री होण्यासाठी तुम्ही भाजपात जाणार, त्याचदिवशी मी भाजप सोडणार, तुमच्या विरुध्द अपक्ष लढणार." अशा आशयाची जाहिरात त्यांनी एका वर्तमानपत्रात दिली आहे. तर आणखी एक भाजपचे नेते राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत.
खा. ओमराजे निंबाळकर यांची काय असणार भूमिका?
उस्मानाबाद लोकसभा मतद्रसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि राणाजगजितसिंह पाटील हे एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी मानले जातात. अशात राणा पाटील भाजपात गेल्यास ओम निंबाळकर यांची भूमिका काय राहीन?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण विधानसभा निवडणुकीत सेना-भाजपाची युती झाल्यास आणि राणा पाटील यांना विधानसभेची उमेदवारी मिळाल्यास ओम निंबाळकर यांना पाटील यांचा प्रचार करावा लागणार आहे.