Sharad Pawar on Oath Ceremony: राज्याच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधकांकडून वारंवार पहाटेच्या शपथविधीच्या विषयाला हात घालत एकमेकांना लक्ष्य केलं जात आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पहाटेचा शपथविधी शरद पवारांची खेळी असू शकते असं विधान करत खळबळ उडवली होती. तसंच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही शरद पवारांच्या (Sharad Pawar) संमतीनेच शपथविधी (Oath Ceremony) झाल्याचं म्हटलं होतं. यानंतर आता स्वत: शरद पवार यांनी यावर भाष्य केलं आहे. पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवारांनी सूचक विधान केलं आहे.
"पहाटेच्या शपथविधीतून सरकार बनविण्याचा प्रयत्न झाला खरा. पण त्यातून एक फायदा झाला. तो म्हणजे राज्यातील राष्ट्रपती राजवट (President Rule) उठली," असं शरद पवार म्हणाले आहेत. राष्ट्रपती राजवट उठल्यानंतर काय झालं हे तुम्ही पाहिलं असेल असंही शरद पवार म्हणाले.
दरम्यान यावेळी पत्रकारांनी शरद पवारांना तुम्हाला पहाटेच्या शपथविधीबाबत माहिती होतं का? अशी विचारणा केली. त्यावर ते म्हणाले की, "जर असं काही घडलं नसतं तर राष्ट्रपती राजवट उठली असती का? राष्ट्रपती राजवट उठली नसती तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते का?". शरद पवारांच्या या विधानामुळे त्यांना नेमकं काय सांगायचं आहे अशी चर्चा रंगली आहे.
23 नोव्हेंबर 2019 रोजी पहाटे महाराष्ट्राच्या राजकारणात एक अभूतपूर्व योग जुळून आला होता. पहाटे राजभवनात कोणालाही काहीही कल्पना नसताना एक शपथविधी पार पडला. यावेळी भाजपा आणि राष्ट्रवादीची युती झाल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. कारण देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.
एकीकडे शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसने एकत्र येत महाविकास आघाडी स्थापन केली असताना अजित पवारांनी भाजपाशी हातमिळवणी केल्याने गदारोळ माजला होता. पण काही दिवसातच हे सरकार कोसळलं आणि अजित पवार पुन्हा एकदा स्वगृही परतले होते. पण हा शपथविधी आजही चर्चेचा विषय आहे. त्यावेळी नेमकं काय घडलं होतं यावर अनेक दावे केले जात असून, शरद पवारच यामागे होते असा अनेकांचा दावा आहे.
उद्धव ठाकरे राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत चर्चा करत असताना आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसकडून आम्हाला स्थिर सरकार हवं आहे अशी ऑफर आली होती. त्यावेळी शरद पवार यांच्यासोबतच चर्चा झाली होती असा दावा फडणवीसांनी केल्यानंतर खळबळ माजली होती. मात्र शरद पवारांनी हा दावा फेटाळून लावला होता. “मला वाटलं देवेंद्र हा सुसंस्कृत माणूस आहे. सभ्य माणूस आहे. असत्याचा आधार घेऊन ते अशाप्रकारचं स्टेटमेंट करतील असं मला कधी वाटलं नाही”, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली होती.