पुणे : मी १९६७ पासून शपथा पाहिल्या आहेत. १९७२ ते १९९० पर्यंत मीसुद्धा शपथा घेतल्या परंतु कुठल्याही राज्यपालांनी मला पेढा भरवला नाही,असे विधान राष्ट्रवादीचे अध्यक्ष, सर्वेसर्वा शरद पवार यांनी करत नाव न घेता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना चिमटा काढलाय. पुण्यात प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी ही टीका केली.
पुण्यातील माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी राज्यपालांच्या कार्यपद्धतीवर अनेक सवाल उपस्थित केले. शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचा शपथविधीचा उल्लेख करताना म्हटले की, शपथ चुकीची होत असताना राज्यपालांनी दुर्लक्ष केले आणि पेढा भरवून फुलांचा गुच्छ देताना आपण पाहिले. चला आनंद आहे एकंदरीत त्यांनी कार्यपद्धतीत बदल केला असा जोरदार टोला देखील शरद पवार यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर लगावला.
तेव्हा राज्यपालांची हरकत....
राज्यात नव्याने आलेल्या सरकारच्या शपथविधीची आठवण करून देताना शरद पवार यांनी सांगितले की, मी टीव्हीवर पाहिले. मी अमुक अमुक बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांना स्मरुन वगैरे वगैरे ते बोलले, ही शपथ दिली कुणी तर राज्यपाल यांनी असे पवार म्हणाले.
ज्यावेळी आमचे सरकार आले त्यावेळी मी पहिल्या लाईनमध्ये बसलो होतो, आमच्या एका सदस्याने बाबासाहेब आंबेडकर व इतरांना स्मरण करून शपथेला सुरुवात केली तर त्यांना याच राज्यपालांनी परत शपथ घ्यायला लावली आणि माझ्या नावाचा उल्लेखही केला. मात्र कालच्या शपथेवेळी राज्यपाल कोश्यारी यांनी हरकत घेतली नाही याबाबत शरद पवार यांनी आश्चर्य व्यक्त केले.
राज्यपाल नियुक्त आमदारांवर काय म्हणाले?
आघाडी सरकारने राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची नावे मंत्रीमंडळाचा प्रस्ताव करुन पाठवला होता. मुळात मंत्रीमंडळाने दिलेल्या प्रस्तावाला राज्यपालांनी मान्यता देणे हे बंधनकारक असते. मात्र जवळपास अडीच वर्ष त्यांनी तो प्रस्ताव तसाच ठेवला व कोणताही निर्णय घेतला नाही, असे शरद पवार म्हणाले. राज्यपालांचा हा निर्णय लोकशाहीला कितपत योग्य आहे याची चर्चा करायची गरज नाही, लोकांना हे सर्व ठाऊक आहे असेही शरद पवार यांनी राज्यपालांच्या एकंदरीत कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.