मावळमधील उमेदवारीवरुन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम

मावळची सुभेदारी कुणाला मिळणार याबाबत प्रश्नचिन्हं

Updated: Mar 8, 2019, 04:02 PM IST
मावळमधील उमेदवारीवरुन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम title=

दीपक भातुसे, मुंबई : मावळ मतदारसंघातील उमेदवारावरून पवार घराण्यात एकमत नसल्याचं समोर आलं आहे. पार्थ पवार हे निवडणूक लढवणार नाहीत अशी घोषणा खुद्द शरद पवारांनी केली आहे. तर दुसरीकडे पार्थ पवारांचा मावळमधील निवडणूक दौरा जोरात आहे. अजित पवारांचे निकटवर्तीय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुनील तटकरे यांनीही अप्रत्यक्षपणे पार्थ यांनाच उमेदवारी देण्याची मागणी केली. तर स्मिता पाटील यांचंही नाव उमेदवारीसाठी चर्चेत आहे. पार्थ पवार निवडणूक लढवणार नाहीत असं खुद्द शरद पवार म्हणत आहेत. मात्र मावळममध्ये वस्तुस्थिती वेगळीच आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातून अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे राष्ट्रवादीचे उमेदवार असतील अशी चर्चा साधारणतः महिनाभरापूर्वी सुरू झाली होती. पार्थने त्यादृष्टीने मावळ मतदारसंघात संपर्क दौरेही सुरू केले. मात्र त्यानंतर शरद पवारांनी पार्थच्या उमेदवारीवर फुली मारली. 

दिवंगत नेते आर. आर. पाटील यांची कन्या स्मिता पाटील यांचंही नाव पुढे आलं. मात्र पवारांच्या या वक्तव्यानंतरही पार्थचे मावळमधील संपर्क दौरे थांबलेले नाहीत. त्यामुळे पार्थ आजही निवडणूक लढवण्यास इच्छूक असल्याचं पुढं आलं आहे. विशेष म्हणजे मावळच्या कार्यकर्त्यांनी पार्थच्या नावाचा आग्रह धरल्याचं सांगत अजित पवार यांचे खंदे समर्थक सुनील तटकरे यांनी पार्थ यांचं नाव पुढं रेलटं आहे. एकीकडे स्वतः पार्थ निवडणूक लढवण्यास इच्छूक आहेत. अजित पवार आणि त्यांच्या घरातील सर्वांनाही पार्थ यांनी मावळच्या मैदानात उतरावं असं वाटतं आहे. मात्र पवारांच्या विधानानंतर पक्षाने स्मिता पाटील यांच्या नावाची चाचपणी सुरू केल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे मावळच्या उमेदवारीवरून पवार घराण्यातच एकमत नसल्याचं समोर आलंय. सुप्रिया सुळे याबाबत स्पष्टपणे बोलायला तयार नाहीत. 

उमेदवारीबाबत सुरू असलेला गोंधळ यामुळे राष्ट्रवादीचे मावळ लोकसभा मतदारसंघातले पदाधिकारी आणि कार्यकर्ते सध्या संभ्रमात आहेत. राष्ट्रवादीकडून मावळची सुभेदारी कुणाला मिळणार याबाबत प्रश्नचिन्हं असलं तरी अजित पवार पार्थच्या उमेदवारीसाठी आग्रही राहणार असल्याची चर्चा पक्षात आहे. त्यामुळे शरद पवारांच्या विधानानंतरही पक्ष शेवटी पार्थ पवार यांच्याच पदरात मावळची सुभेदारी टाकणार अशी शक्यता आहे.