ठाणे : मुंबईपाठोपाठ झपाट्याने बदलणाऱ्या ठाणे शहरातील नागरिकांना शिवसेनेने स्वातंत्र्यदिनी खास भेट दिली आहे. ठाणेकरांसाठी शिवसेनेने नवीन गायमुखी चौपाटी भेट दिली. विरंगुळ्याचे केंद्र असलेल्या हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे चौपाटीचे अनावरण युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
चौपाटी आणि वनस्थळी उद्यान ठाणेकरांसाठी खुले झाले आहे. सोबतच आगरी-कोळी भवन, गायमुख घाटाचेही भूमिपूजन करण्यात आले. स्वातंत्र्यदिनाची ही अनोखी भेटच मिळाल्याने ठाणेकरांच्या आनंदात भर पडली आहे.
दरम्यान, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पायथ्याशी असलेल्या ठाणे माहापालिकेच्या भूखंडावर साकारलेल्या उद्यानाचे काल लोकार्पण सोहळा पार पडला. पाच महिन्यात दुसऱ्यांदा हा लोकार्पण सोहळा करण्यात आला आहे. यात नाराज झालेल्या भाजप नेत्यांची नाराजी दूर करण्यात शिवसेनेला यश आले आहे. भाजपचे गटनते नारायण पवार यांच्या हस्ते नारळ वाढवण्यात आला. या उद्यानाचे नाव हे स्व. वसंत डावखरे उद्यान हेच असेल, अशी ग्वाहीही यावेळी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.