जावेद मुलाणी, झी मीडिया, बारामती : गावची यात्रा म्हटलं की कुस्त्यांचे जगी आखाडा आणि बैलगाडाशर्यत आणि रात्री तमाशा असे समीकरण असते, मात्र गेली अनेक वर्षांपासून बैलगाडा शर्यतीवर बंदी असल्याने नाराजी आहे, त्यावर बारामती तालुक्यातील डोर्लेवाडीत तुकाराम बीजेनिमित्त ग्रामस्थांनी अनोखी स्पर्धा सुरु केलीय, ती म्हणजे घोड्यांच्या नृत्याची. या स्पर्धेत तब्बल ५० घोड्यांनी सहभाग घेतला आणि गावच्या यात्रेत एका नवीन कार्यक्रमाला सुरुवात झाली.
बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी,या गावात दरवर्षी तुकाराम बीजेनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. यात कुस्त्यांचा आखाडा, बैलगाडा शर्यती आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. मात्र बंदीमुळे गेल्या काही वर्षात या गावात बैलगाडा शर्यती झाल्या नाहीत. यावर पर्याय म्हणून बैलगाडा शर्यत आयोजित करण्याच्या फंदात न पडता यावर्षी घोड्यांच्या नृत्याच्या अनोख्या आणि आगळ्यावेगळ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आलंय.
डोर्लेवाडी गावात गेल्या ६० वर्षांपासून तुकाराम बीज आगळ्यावेगळ्या पद्धतीनं साजरी केली जाते. पण बैल गाडा शर्यतीवर बंदी असल्याने त्या जागी नवीन काही तरी स्पर्धा घ्यावी त्यातूनच वेगळेपण जपण्यासाठी घोड्यांच्या नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला.
या स्पर्धेत सहभागी झालेले घोडामालक आपापल्या परीनं घोड्यांची नृत्यकला सादर करत होते. घोड्यांना दिलेलं प्रशिक्षण. विशिष्ट आवाज कानावर पडल्यानंतर त्यांच्याकडून होणारी कृती. या सर्व बाबी उपस्थितांना चकित करणाऱ्या होत्या. दोन पायांवर उभं राहून सादर केलेलं नृत्य. संगीताच्या आवाजानंतर विशिष्ट लकबीत हालचाल. यामुळं ही स्पर्धा अनोखी ठरली.
अशा प्रकारच्या स्पर्धा क्वचितच होत असतात.. त्यामुळं या स्पर्धा राज्यस्तरावर झाल्यास घोडेमालकानाही चांगले दिवस येतील.