कोरोनाबाबतच्या बातम्या, रुग्णांची हेळसांड याची हायकोर्टाकडून गंभीर दखल

 एडव्होकेट सत्यजित बोराडे यांची न्यायालयीन मित्र म्हणून नियुक्ती 

Updated: Apr 23, 2021, 12:22 PM IST
कोरोनाबाबतच्या बातम्या, रुग्णांची हेळसांड याची हायकोर्टाकडून गंभीर दखल title=

मुंबई : कोरोना बाबत प्रसारमाध्यमात येणाऱ्या बातम्या, रुग्णांची होणारी हेळसांड याबाबतच्या बातम्या याची मुंबई हायकोर्टाच्या (Mumbai High Court) औरंगाबाद खंडपीठानं (Aurangabad bench) गंभीर दखल घेतली आहे आणि एक सू-मोटो याचिका खंडपीठाने दाखल करून घेतली आहे. यात कोर्टाने एडव्होकेट सत्यजित बोराडे (Advocate Satyajit Borade) यांची न्यायालयीन मित्र म्हणून नियुक्ती केली आहे.

गेल्या काही दिवसात प्रसारमाध्यमात कोरोनाबाबत आलेल्या बातम्या, रुग्णांचे झालेले हाल, इंजेक्शनचा काळाबाजार, रुग्णांची फसवणूक अशा सगळ्याच गोष्टींची कोर्टाने सुमोटो याचिकेत दखल घेतली आहे येत्या सोमवारी यावर दुपारी अडीच वाजता ऑनलाईन सुनावणी होणार आहे. 
 
मराठवाड्यातही (Marathwada) ऑक्सिजनची आणिबाणी लागू झालीय. औरंगाबादला (Aurangabad) दररोज 60 मेट्रीक टन ऑक्सिजनची सध्याची गरज आहे. मात्र इथं केवळ 15 मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादन होतं. पुणे (Pune), आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) आणि कर्नाटकातून Karnatak) ऑक्सिजन आणण्याची वेळ मराठवाड्यावर आलीय. ऑक्सिजन तुटवड्यामुळं श्वासाची किंमत आता 600 किलोमीटरवर गेल्याचं दुर्दैवी चित्र आहे. अगदी मुंबई-पुणे-नागपूरसारख्या शहरांनाही ऑक्सिजन पुरत नाहीय...

मुंबईला दररोज 235 टन ऑक्सिजन पुरवठा होतोय. मात्र वाढती रुग्णसंख्या पाहता मुंबईताल 300 टन ऑक्सिजनची गरज आहे. नागपूरमध्ये 155 टन ऑक्सिजनचा पुरवठा होतोय. पण गरज आहे ती 180 टन ऑक्सिजनची. पुण्यामध्ये 300 टन ऑक्सिजन उपलब्ध आहे. मात्र तब्बल 375 टन ऑक्सिजनची गरज आहे.
 
महाराष्ट्राला ऑक्सिजन मिळावा, यासाठी नवी मुंबईतून विशाखापट्टणमला ऑक्सिजन एक्स्प्रेस रवाना झाली. राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेडकडून क्रायोजेनिक टँकरमधून सुमारे 100 टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजन घेऊन ही एक्स्प्रेस शुक्रवारी पहाटे राज्यात पोहोचणार आहे.

मात्र तेवढ्यानं महाराष्ट्राची गरज भागणार नाहीय. परिस्थिती फारच भयावह आहे. पुरवठ्यात थोडा जरी खंड पडला तरी शेकडो श्वास अडकू शकतात.. त्यामुळं राज्याचं प्रशासन आणि आरोग्य यंत्रणाच व्हेंटिलेटरवर आहे.