पराग ढोबळे, झी मीडिया, नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari ) यांची भाषण नेहमीच चर्चेत असतात. आता त्यांचे नागपूर(Nagpur) येथील ताजुद्दीन बाबा दरगाह येथे विकास कामाचे लोकार्पण करताना केलेल्या भाषणाची चांगलीच चर्चा होत आहे. जो मत देईल त्याचे ही काम करेन आणि जो मत देणार नाही त्याचे ही काम करणार असं वक्तव्य नितीन गडकरी यांनी केले आहे.
जे चांगलं आहे ते चांगलं आहे. मला राजकारणाची कुठलीही परवा नाही. तुम्हाला योग्य वाटत असेल तर मतदान करा. नाहीतर वोट देऊ नका जो वोट देईल त्याचाही काम करू आणि जो नाही देईल त्याचाही काम करू असे नितीन गडकरी आपल्या भाषणात म्हणाले.
मागील निवडणुकीत ताजबाग परिसरातून मतदान कमी मिळालं मात्र मी नाराज नाही. वोट कोणाला द्यायचा आहे हा तुमचा अधिकार आहे. आमची सेवा कमी पडली असेल, तर आम्ही अधिक सेवा करू, अधिक विश्वास जिंकू. त्यामुळे जातपंथ धर्माचा नावावर राजकारण आम्हाला करायचं नाही. मी माणुसकी आणि मानवतेचा विचार करतो, गरीब सर्वसामान्य लोकांची सेवा करण्यासाठी राजनीतीत आलो आहे असं देखील गडकरी म्हणाले.
मत द्यायचं असेल तर द्या मी काही एकटा इथे आयुष्यभर खासदार होण्याचा ठेका घेतलेला नाही. मी गेलो तरी अजून कोणी दुसरा येईल. मी सगळ्यांसाठीच काम करणार, काँग्रेस असो भाजप असो, शिवसेना असो, की राष्ट्रवादी. जो येईल त्याचं काम करेल. मी जनतेचा प्रतिनिधी आहे असेही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.