पुण्यात धावणार आता ई-बस, २५ इलेक्ट्रिक बस दाखल

पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात उद्यापासून अर्थात शनिवारपासून विजेवर चालणाऱ्या बस धावणार आहेत.  

Updated: Feb 8, 2019, 04:11 PM IST
पुण्यात धावणार आता ई-बस, २५ इलेक्ट्रिक बस दाखल title=

पुणे : पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात उद्यापासून अर्थात शनिवारपासून विजेवर चालणाऱ्या बस धावणार आहेत. पीएमपीएलच्या ताफ्यात २५ इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या आहेत. यातील १५ बसची पुण्यात तर १० बसची पिंपरी - चिंचवडमध्ये शनिवार पासून सेवा सुरु होणार आहे. पर्यावरण पूरक या ई-बस आहेत. बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ई-बस पुण्यात दाखल झाल्या आहेत. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत या बस घेण्यात आल्या आहेत. या योजने अंतर्गत एकूण ५०० ई - बस पीएमपीएलच्या ताफ्यात येणार आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात दीडशे बस घेतल्या जाणार आहेत. 

या दीडशे बस पैकी २५ बस प्रत्यक्षात दाखल झाल्या आहेत. यास सर्व २५ बस ९ मीटर लांबीच्या आहेत. आणि विशेष म्हणजे या सर्व बस वातानुकूलित आहेत. त्यामुळं ऐन उन्हाळ्यात पीएमपीएल प्रवाशांना या गारेगार प्रवासचा सुखद अनुभव घेता येणार आहे. पुणे आणि पिंपरी - चिंचवडमधील सहा मार्गांवर या ई-बस धावणार आहेत. तर त्यांच्या चार्जिंगसाठी पुण्यातील भेकराई आणि पिंपरी - चिंचवडमधील निगडी आगारात सुविधा निर्माण करण्यात आली आहे.

एकदा चार्ज केल्यानंतर एक बस २२५ किलोमीटर धावू शकते. चार्जिंगसाठी प्रति युनिट आठ रुपये एव्हढा खर्च येतो. ई- बसमुळे डिझेलचा वाढता खर्च कमी होणार आहेच. पण त्याचबरोबर शहरातील प्रदूषण देखील कमी होणार आहे. एवढे सर्व असूनही नेहमीच्या बसपेक्षा तिकीट दर कमी असणार आहे. आता या ई-बस तरी किमान पीएमपीएलचा प्रवास सुखकर करतील अशी चर्चा सध्या सुरु झाली आहे.