मुंबई: राज्य सरकारनं नवीन नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार राज्यातील 25 जिल्ह्यांमध्ये रात्री 8 वाजेपर्यंत दुकानं सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. तर 11 जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम आहेत. राज्य सरकारच्या नव्या नियमावलीकडे जनतेचं लक्ष लागलं होतं. अखेर ही प्रतिक्षा संपलेली आहे. रात्री 8 वाजेपर्यंत दुकानं उघडण्याची नागरिकांना परवानगी दिली आहे.
राज्यातील 25 जिल्ह्यांमधील नियमात शिथिलता आणली आहे. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यातील कोणत्या गोष्टी सुरू राहणार आणि कसे आहेत नवीन नियम जाणून घ्या.
राज्यातील 25 जिल्ह्यांमधील दुकानं सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवनगी देण्यात आली आहे. शनिवारी दुपारी 3 वाजेपर्यंत दुकानं सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. रविवारी संपूर्ण दुकानं विकेण्ड लॉकडाऊन प्रमाणे बंद राहणार आहेत. मॉल्स उघडण्यासही नव्या गाइडलाइन्सनुसार परवानगी देण्यात आली आहे. जिम, योगा सेंटर, सलून, ब्युटी पार्लर, स्पा - 50 टक्के क्षमतेने रात्री 8 वा पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी.
खासगी कार्यालयं देखील पूर्ण क्षमतेनं सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व सरकारी कार्यालयं 100 टक्के क्षमतेने सुरु होणार आहेत. 25 जिल्ह्यांमध्ये खासगी आणि सरकारी कार्यालयं सुरू होणार असल्यानं मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्यात कोरोनाचा जोर पाहून गरजेनुसार सरकारी कार्यालयांमध्ये मोजक्याच कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कामकाज सुरु होतं. दरम्या या नव्या नियमावलींनुसार, सर्व शासकीय कार्यालयं ही 100 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीने सुरु होणार आहेत. त्यामुळे आता कामकाज अधिक वेगाने होणार आहे.
राज्यातील सर्व धार्मिक क्षेत्र ही बंदच राहणार आहेत. राज्यात काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर अनेक भक्त गर्दी करतात. यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची भिती असते. त्यामुळे सरकारने खबरदारी म्हणून धार्मिक स्थळं बंदच ठेवण्याचा निर्णय कायम ठेवला आहे.
कोरोना आणि तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सध्या सिनेमा, थिएटर आणि नाट्यगृह सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे थिएटर आणि सिनेमागृह आणि नाट्यगृह बंदच राहणार आहेत.
राज्यात सर्वसामांन्यासाठी लोकल बंदच आहे. राज्य सरकारच्या नव्या नियमावलीत लोकल रेल्वेबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. सर्वांसाठी लोकल सुरु करण्याबबातचा निर्णय हा प्रशासनाशी बोलून घेण्यात येणार आहे.
कोल्हापूर
सांगली
सातारा
पुणे
रत्नागिरी
सिंधुदुर्ग
सोलापूर
अहमदनगर
बीड
रायगड
पालघर