अरूण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : पाण्यापासून सोनं तयार होतं असं जर तुम्हाला कुणी सांगितलं तर? विश्वास बसणार नाही ना? पण संशोधकांनी ही किमया करून दाखवलीय. त्यांनी चक्क पाण्यापासून सोनं तयार केलंय.
तसं अंगावर सोनं घालायला कुणाला आवडत नाही. महिलांना तर सोन्याच्या दागिन्यांची प्रचंड क्रेझ असते. पण सोन्याचे भाव ऐकल्यानंतर प्रत्येकालाच आपली हौस भागवणं शक्य होत नाही. त्यामुळं अनेकजण सोन्याचं पाणी दिलेले दागिने वापरतात.
पण आता काळजी करू नका. सोन्याचं पाणी नाही तर पाण्याचंच सोनं होणाराय. चेक रिपब्लिकमधल्या संशोधकांनी हे अद्भुत तंत्रज्ञान विकसित केलं आहे. ज्यामुळं सोनं भविष्यात फॅक्टरीत तयार होऊ शकेल आणि ते देखील पाण्यापासून.
सर्वसाधारणपणे द्रवरूपातील वस्तूवर अत्याधिक दाब पडला की त्याचं रूपांतर धातूमध्ये होतं. पाण्यावरही 1.5 कोटी ऍटमॉस्फिरिक प्रेशर दिल्यानंतर पाण्याचं धातूत रुपांतर होऊ शकतं. संशोधक पावेल जंगवर्थ यांनी त्यासाठी एक वेगळा पर्याय शोधला. ‘इलेक्ट्रॉन शेअरिंग’साठी त्यांनी ‘अल्कली मेटल’चा वापर केला.
एका सिरिंजमध्ये पोटॅशियम आणि सोडियम भरून ते निर्वात पोकळीत ठेवण्यात आलं. सिरिंजमधील या मिश्रणाचे काही थेंब काढून त्यांना कमी प्रमाणात वाफ देण्यात आली. या थेंबांवर काही सेकंदांसाठी पाणी जमा झालं. अपेक्षेप्रमाणेच मिश्रणाच्या थेंबांमधून इलेक्ट्रॉन पाण्यात गेले आणि काही वेळेसाठी पाणी सोनेरी झालं.
सोनं बनवण्याची ही प्रक्रिया प्रचंड किचकट असली तरी अशक्य मुळीच नाही. भविष्यात यावर संशोधन झालं तर पाण्यापासून सोनं नक्कीच तयार होऊ शकतं आणि तसं झालं तर अवघ्या जगात सोनेरी दिवस यायला फारसा वेळ लागणार नाही.