कोल्हापूर : कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनची (Omicron) जगभरात दहशत पसरली आहे. भारतातही कोरोनाचे रुग्ण आढळत असून यापैकी सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्यात कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉन हळूहळू हातपाय पसरतोय. डोंबिवली, पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई आणि विदर्भानंतर आता कोल्हापूरमध्ये ओमायक्रॉनचा शिरकाव झाला आहे.
कोल्हापूरात ओमायक्रॉनचा पहिला संशयित रुग्ण आढळला आहे. ऑस्ट्रेलियामधून आलेल्या ४५ वर्षीय नागरिकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आढळला आहे. ऑस्ट्रेलियातून एकूण ५ जण कोल्हापूरात आले. यापैकी ४ जणांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला. तर एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आढळला.
संशयित रुग्णाचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले असून अहवाल प्रतिक्षेत आहे.
ओमायक्रॉनचा शिरकाव झाल्यापासून कोल्हापूरमध्ये ४३२ प्रवासी आले असून यापैकी ३३० जणांची तपासणी करण्यात पूर्ण झाली आहे. यात ३०० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून ३० जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.
नागपूरमध्येही ओमायक्रॉनचा रुग्ण
नागपुरात काल ओमायक्रॉनचा रुग्ण आढळून आला होता ओमायक्रॉनबाधित रुग्णावर खबरदारी म्हणून खासगी रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु आहेत. याबाबतची माहिती महापालिका आयुक्त राधाकृष्ण बी यांनी दिली आहे. नव्या विषाणूनची लागण झालेला रुग्ण 40 वर्षांचा आहे. या रुग्णाला प्रवासाचा इतिहास आहे. ओमायक्रॉनचा सर्वाधिक धोका असलेल्या दक्षिण आफ्रिकेतून ही व्यक्ती प्रवास करुन आली होती.