गायीच्या धडकेत नागपुरात एकाचा मृत्यू

शनिवारी मुरलीधर दातारकर भाजी बाजारात गेले पण घरी त्यांचा मृतदेहच आला. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 15, 2018, 04:52 PM IST
गायीच्या धडकेत नागपुरात एकाचा मृत्यू title=

नागपूर : रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट गायीच्या धडकीत एका 62 वर्षीय व्यक्तीचा नागपुरात मृत्यू झाला. शनिवारी मुरलीधर दातारकर भाजी बाजारात गेले पण घरी त्यांचा मृतदेहच आला. 

गायीकडून दातारकर यांच्यावर हल्ला

बाजारात भाजी घेत असताना चवताळलेल्या एका गायीने दातारकर यांच्यावर हल्ला केला. हल्ला एवढा भीषण होता की दातारकर यांचा पायच गायीने चिरून टाकला. दातारकर यांनी उठून उभं राहण्याचा प्रयत्न केला असता गायीने त्यांच्या छातीवर वार केले. जखमी अवस्थेत त्यांना रूग्णालयात नेताना वाटेत दातारकर यांचा मृत्यू झालाय. 

भाजी मंडईत मोकाट गाई, बैलांची संख्या मोठी

मोकाट जनावरांच्या धडकेत यापूर्वीही अनेकांनी आपला जीव गमावला आहे. नागपूरच्या महात्मा फुले भाजी मंडईत मोकाट गाई, बैलांची संख्या मोठी आहे. त्यांचा हा नेहमीचाच त्रास झालाय. 

गायी मोकळ्या सोडणाऱ्या मालकांविरोधात कारवाई

दातारकर यांच्यावर हल्ला करण्याआधी या गायीने आणखी दोघांवर हल्ला केला होता. मात्र सुदैवाने त्या दोघांचा जीव वाचला. मनपाने या गायीला पकडलंय. अशाप्रकारे बेजबाबदारपणे रस्त्यावर गायी मोकळ्या सोडणाऱ्या मालकांविरोधात कारवाई होणार आहे. 

गोवंश वाचवण्यासाठी अनेक संघटना आंदोलनं आणि अगदी माणसांवर हल्लेही करतायत. मात्र दुसरीकडे असे गोवंश रस्त्यावर मोकाट सोडणाऱ्यांनाही वेसण घालणं गरजेचं आहे. मोकाट गायीमुळे दातारकरांचा हकनाक बळी गेलाय, पण आता या गायीच्या मालकाला मोकाट सोडण्यात अर्थ नाही.