वर्षभराच्या मुलानं खेळता खेळता गिळली व्हिक्सची डबी; डॉक्टरही हादरले आणि मग...

आजची नवी पिढी काय करेल याचा भरवसा नाही. नाशिकमध्ये असाच एक प्रकार घडला ज्यामुळं चिमुकल्याच्या घरातील मंडळीही हादरले. डॉक्टरांनी सांगितले जीव धोक्यात...

योगेश खरे | Updated: Sep 6, 2024, 12:10 PM IST
वर्षभराच्या मुलानं खेळता खेळता गिळली व्हिक्सची डबी; डॉक्टरही हादरले आणि मग... title=

योगेश खरे, झी मीडिया,

नाशिक : आजकाल लहान मुलं काय करतील याचा नेम नाही. नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात असाच एक प्रकार काकड कुटुंबियांच्या घरात घडला. पानेवाडी गावात सागर काकड यांना मल्हार हा एका वर्षाचा मुलगा खेळत असताना या मुलाने खेळता खेळता छोटी व्हिक्सची डबी हातात घेतली आणि खाऊ असल्याचं समजून खाण्याच्या प्रयत्न करत थेट ती डबी गिळली. 

ती डबी गळ्यातच अडकल्याने तासभर घरच्यांनी विविध प्रकारे ती बाहेर काढण्याच्या प्रयत्न केला. घरापासून डॉक्टर अडीच तीन किलोमीटरवर मनमाडमध्ये असल्याने घरच्यांनी ती डबी बाहेर काढण्यासाठी खुप प्रयत्न केले. पण यातून काही चांगले होण्याऐवजी मल्हार रक्तबंबाळ झाला आणि त्याने जास्तच रडायला सुरूवात केली. 

 

 

बालरोगतज्ज्ञ डॉ. रवींद्र रजपूत आणि डॉ. विजय रजपूत यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्याच्यावर त्वरित उपचार सुरू केले. या सगळ्या प्रकारा दरम्यान मल्हारची ऑक्सिजन पातळी 36-37 पर्यंत खाली घसरली होती. तसेच फुफ्फुसाला ऑक्सिजन पुरवणारा मार्गही 80 ते 90 टक्के बंद झाला होता. यामुळे डॉक्टरांच्या समोर दुहेरी आव्हान होते. मात्र डॉक्टर रजपूत यांनी शर्थीचे प्रयत्न करत लरिंगोस्कोपच्या मदतीने मल्हारच्या घशात अडकलेली व्हिक्सची डबी बाहेर काढून त्याचे प्राण वाचविले. मल्हारला हॉस्पिटल मध्ये आणण्यास अजून थोडा जरी उशीर झाला असता किंवा घशात अडकलेली डबी बाहेर काढताना आणखी थोडी खाली सरकली असती तर मल्हारच्या जिवासही धोका होता.

लहान मुलांवर लक्ष ठेवा नाहीतर... 

लहानमुले नेहमी काही ना काही उद्योग करत असतात. त्यांच्याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागते. खेळता खेळता ते काय करतील याचा भरवसा नसतो. लहान मुलांना सांभाळणे म्हणजे मोठी जबाबदारीच असते. आपण अनेक वेळा लहान मुलांनी शाळेत किंवा अगदी घरातसुद्धा खडू, पाटीवरची पेन्सिल वगैरे नाकात घातल्याचा घटना ऐकत असतो. पण काही वेळा अशा नाजूक अवयवांशी केलेला खेळ जीवघेणा ठरू शकतो. मल्हारसोबतही असंच घडलं. 

एक-दीड वर्षाची लहानमुले हातात मिळेल ती वस्तू तोंडात घालतात. त्यांना प्रत्येक वस्तू खाऊ आहे असेच वाटत असते. पण काही वेळा तोंडात अशा छोट्या वस्तू घातल्याने त्या घशात अडकून खूप त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा छोट्या वस्तू लहान मुलांपासून दूर ठेवलेल्याच बऱ्या.