नाशिक : गेल्या चार दिवसापासून नाशिक जिल्ह्यात कांद्याचे दर पुन्हा एकदा विक्रमी दराकडे येऊ लागले आहेत. या हंगामातील उच्चांकी दर 5300 रूपये प्रतिक्विंटल हा लासलगाव बाजार समितीत नोंदवण्यात आला आहे. गेल्या तीन-चार दिवसात दर झपाट्याने वाढत असून दिवसाकाठी तीनशे ते चारशे रुपयाची वाढ होताना दिसत आहे.
परतीच्या पावसाने लेट खरीप कांदा 50 ते 60 टक्के नुकसानीत गेला आहे. परिणामी दर वाढताना दिसत आहेत. परतीचा पाऊस असाच लांबच राहिल्यास देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकार समोर पुन्हा एक नवीन कांदा संकट निर्माण होणार आहे.
कांद्याचे वाढते दर रोखण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याची निर्यात थांबवली होती. पण तरीही शहरात कांदा महागला आहे. सर्वसामान्यांना याचा फटका बसला आहे. कारण कांदा ५० ते ६० रुपयांच्या घरात पोहोचला आहे.
सततच्या पावसामुळे भाजीपाला, तसेच फळं महागण्याची देखील चिन्हं दिसून आहेत. कांदा पिकालाही मोठा फटका बसला आहे. कोकण विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी सर्वाधिक नुकसान दिसून येत आहे.