पंढरपूर महिला बचत गट झाले मालामाल; असा घेतला PM सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ

पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग या योजनेमुळे पंढरपुरातील शारदा बचत गटाच्या या महिलांना घरातील कामे करत हाताला रोजगार ही मिळाला. आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत सुरू झाला. या महिला आपल्या पायावर सक्षम झाल्या आहेत. घर सांभाळणारी स्त्री आता आपला व्यवसाय ही सांभाळू लागली आहे.

Updated: Jan 23, 2024, 05:56 PM IST
पंढरपूर महिला बचत गट झाले मालामाल; असा घेतला PM सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ  title=

PM Micro Food Processing Industries : पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना मधून पंढरपूर शहरातील महिला बचत गटाला घरबसल्या आर्थिक उत्पन्नाची संधी प्राप्त झालेली आहे. या योजनेच्या माध्यमातून बचत गटातील महिला आर्थिक सक्षम बनवू लागल्या आहेत. पंढरपूर शहरातील ईसबावी या भागातील अनिता राजेंद्र पवार यांनी पुढाकार घेऊन दहा महिलांचा बचत गट तयार केला होता. या बचत गटाच्या माध्यमातून वेगवेगळे घरगुती पदार्थ विक्रीसाठी तयार केले जात होते. नगरपालिकेच्या माध्यमातून त्यांना पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग या योजनेविषयी माहिती मिळाली.

योजने अंतर्गत 18 वर्षावरील वैयक्तिक मालकी, भागीदारी, शेतकरी उत्पादक गट संस्था कंपनी, स्वयंसहाय्यता गट व सहकारी उत्पादक संस्था, बेरोजगार युवक, महिला, प्रगतशील शेतकरी यांना एकूण प्रकल्प किंमतीच्या 35 टक्के किंवा जास्तीत जास्त 10 लाखपर्यंत सबसिडी अनुदानाचा लाभ दिला जातो.

ही माहिती मिळाल्यानंतर आपल्या बचत गटातील महिलांना पवार यांनी याबाबत मार्गदर्शन केले. त्यांच्या बचत गटाचे असणारे सुरू असलेले चांगले काम यामुळे या योजनेच्या माध्यमातून चार लाख रुपयांच्या भांडवलासाठी त्यांचा बचत गट पात्र झाला. सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर बँकेकडून त्यांना चार लाख रुपये बचत गटाच्या पुढील कामासाठी कर्ज प्राप्त झाले.

सध्या शारदा महिला बचत गटातील महिला मिरची कांडप मशीनच्या माध्यमातून काळे तिखट, लाल तिखट, जवस चटणी, शेंगदाणा चटणी तयार करतात. पंढरपूर आणि आसपासच्या परिसरातील हॉटेल खानावळ तसेच घरगुती ग्राहकांना त्यांच्या बचत गटाच्या माध्यमातून तयार केलेले विविध चटणी विक्री केली जाते. यामुळे त्यांच्या बचत गटाची आर्थिक उलाढाल वाढलेली आहे. आर्थिक स्त्रोत चालू झाल्यामुळे घेतलेल्या कर्जाचे हप्ते सुद्धा या बचत गटाकडून वेळेवर भरले जात आहेत. आता यापुढे बचत गटातील महिलांना सक्षम होण्यासाठी त्यांच्याकडून उत्पादित झालेले पदार्थ अधिक ठिकाणी विक्रीसाठी चांगले मार्केटिंग त्यांच्याकडून करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच वर्षभर जे पदार्थ विक्री होऊ शकतात त्याचे उत्पादन सुरू करून त्यातून महिलांच्या हातांना रोजगार देण्याचा या बचत गटाचा प्रयत्न आहे.