Pankaja Munde Interview : महाराष्ट्रात शिवशक्ती यात्रा काढल्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. या यात्रेच्या निमित्ताने त्यांनी काही जिल्हे पिंजून काढले. अनेक धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. त्यानंतर आता जीएसटी आयुक्तालयाने पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला नोटीस बजावली, त्यावर महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेला उधाण आलंय. अशातच झी 24 तासला दिलेल्या ब्लॅक अँड व्हाईट मुलाखतीमध्ये (Black and White Interview) पंकजा मुंडे यांनी मोठं वक्तव्य केलंय.
सारख कारखान्याला नोटीस आली नसून ती कारवाई झाली आहे. जीएसटीच्या वसुलीची कारवाई झाली आहे. कारखाना आजारी असल्याने व्याज माफ करा, अशी माझी मागणी होती. अचानक तीन महिन्यापूर्वी अचानक रेड पडली. आकड्यांमध्ये तफावत होती. कारखाना नुकसानीत असल्याने आम्ही त्याचे पैसे भरू शकलो, हे सत्य आहे, असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
एकनाथ खडसेंची नाराजी देखील तीच आहे. त्यांनी वेगळी वाट धरली, मात्र, पंकजा मुंडे कायम आहेत. याचं काय गमक आहे? असा सवाल पंकजांना विचारला गेला. त्यावेळी त्यांनी खुलासा केला. मी एक स्त्री आहे, त्यामुळे माझ्यामध्ये ती ताकद आहे. एखादी स्त्री जेव्हा एखाद्याला आपलं मानते, तेव्हा ती एकनिष्ठ असते. माझ्या पक्षाबद्दल माझी भूमिका देखील अशीच आहे. मला माहिती नाही, लोक कसे पक्ष बदलतात. हे एवढं सोपं आहे का? पंकजा मुंडे पक्ष आणि परिवार यात भेद करत नाही. मी कधीही उघड नाराजी व्यक्त केली नाही. महत्त्वतकांक्षा कोणात नसते? पण, मला डॅमेज करण्यासाठी माझ्यावर महत्त्वाकांक्षा लादली गेली. माझे हितचिंतकांनी वावड्या सोडल्या. माझ्यासमोर पर्याय होते. मात्र, मी खंबीर राहिले, असं पंकजा म्हणाल्या आहेत.
माझा पराभव झाल्यानंतर एकच व्यक्ती होती, ज्यांनी मला फोन केला, ते उद्धवजी ठाकरे होते. तेव्हा आमची भेट झाली होती. त्यानंतर माझी आणि त्यांची भेट झाली नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. माझ्या कार्यकर्त्यांनी शिवशक्ती यात्रेमध्ये खूप काम केलं. मी मंत्रीपदावर नाही, तरी देखील परिक्रमा एवढी भव्य झाली की लोकांचं प्रेम किती आहे याची कल्पना येते. मी यांना काय दिलंय? असा प्रश्न मला पडला होता, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.
दरम्यान, मी संघिष्ठ कार्यकर्ता आहे, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. पंकजा मुंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रश्न विचारला गेला, त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीवर मी उत्तर देणार नाही, असं उत्तर पंकजा मुंडे यांनी दिलं.