गजानन देशमुख, झी मीडिया
Parbhani News Today: परभणीतून जिंतुरमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महावितरणच्या सावळ्या गोंधळामुळं चिमुकलीला जीव गमवावा लागला आहे. या घटनेने परिसरात एकच गोंधळ उडाला असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.
परभणीच्या जिंतूर शहरात महावितरणच्या सावळा गोंधळामुळे एका चिमुकलीचा जीव गेल्याची घटना समोर आली आहे. जिंतूर शहरातील मिश्किन प्लॉट परिसरात 3 वर्षीय फरीया शेख ही चिमुकली खेळत असताना तिचा स्पर्श त्या ठिकाणी असलेल्या एका विजेच्या खांबाला झाला. या खांबात वीज प्रवाह उतरला होता. त्यामुळं तिला विजेचा धक्का लागला.
वीजेचा धक्का लागल्याने चिमुकली तडफडत खाली कोसळली. चिमुकली खाली कोसळल्यानंतर तिथे असलेल्या नागरिकांनी तिला तातडीने जिंतूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. वैद्यकीय अधिकार्यांनी तिला तपासून मृत घोषित केलं. महावितरणच्या सावळ्या गोंधळामुळेच ही घटना घडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांमधून करण्यात येत आहे.
नांदेड आणि परभणी जिल्ह्यात धर्मिक कार्यक्रमात भगर खाल्याने हजारो जणांना विषबाधा झाल्याची घटना ताजी असतानाच हिंगोली जिल्ह्यात ही भगरीतून विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. कळमनुरी तालुक्यातील रेणापूर गावात एकादशी निमित्त उपवासाला भगर खाल्याने अंदाजे दोनशे लोकांना विषबाधा झाली आहे. रेणापूर येथे अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे काल एकादशी असल्याने उपवासाला फराळ म्हणून भगर केली होती. भगर खाल्ल्याने गावातील अनेकांना उलटी शौचाचा त्रास सुरू झाला. त्यापैकी 75 जणांवर हिंगोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून गावातील विषबाधा झालेल्या नागरिकांना रुग्णालयात आणण्याचे काम आजूनही सुरूच आहे. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.