शोभायात्रेत पोलिसांनी डीजे लावू दिला नाही, दोन तरुणांनी थेट विषारी औषधाची बाटलीच तोंडाला लावली

रामनवमीनित्ताने परभणीत शोभायात्रा काढण्यात आली होती. या शोभायात्रेत पोलिसांनी डीज लावण्यास मनाई केल्याने दोन तरुणांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. दोनही तरुणांना उपचारासाठी रुग्णलयात दाखल करण्यात आलं आहे. 

Updated: Mar 30, 2023, 10:39 PM IST
शोभायात्रेत पोलिसांनी डीजे लावू दिला नाही, दोन तरुणांनी थेट विषारी औषधाची बाटलीच तोंडाला लावली

गजानन देशमुख, झी मीडिया, परभणी : देशभरात मोठ्या उत्साहात रामनवमीचा (Ram Navami) उत्सव साजरा करण्यात येतोय. दुपारी 12 वाजता भक्तांच्या उपस्थितीत रामजन्म सोहळा साजरा करण्यात आला. महाराष्ट्रात (Maharashtra) महाराष्ट्रातील मंदिरं भक्तांनी गजबली होती. राम नवमीनिमित्त शिर्डीतील साई मंदिरात (Shirdi Sai Temple) भाविकांनी (Devotee) मोठ्याप्रमाणावर गर्दी केली. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शोभायात्रा काढण्यात आली. परभणीतही रामनवमी निमित्ताने शोभायात्रा काढण्यात आली होती. पण शोभायात्रेला गालबोट लागलं. 

शोभायात्रेला गालबोट
रामनवमीनिमित्ताने परभणीतल्या मानवत इथं शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. मानवत इथल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी काही तरुणांनी शोभायात्रेत डीजे (DJ) वाजवण्याची परवानगी पोलिसांकडे मागितली. पण पोलिसांनी याला मनाई केली. त्यामुळे यातल्या दोन तरुणांनी धक्कादायक पाऊल उचललं. या दोन तरुणांनी थेट विषारी औषध प्राशन करत आत्महत्येचा (Suicide) प्रयत्न केला. शुभम अप्पराव दहे (वय 23) शिवप्रसाद बिडवे (वय 22)  अशी या दोघांची नावं आहेत. यानंतर त्यांनी अत्यवस्थ वाटू लागल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 

पोलिसानी डीजे लावण्यास परवानगी दिली नाही, तसंच आपल्या मुलांबरोबर पोलिसांनी अरेरावी केली असा आरोप दोनही मुलांच्या पालकांनी केला आहे. आपल्या मुलांच्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास त्याला पोलिसच जबाबदार असल्याचंही पालकांनी म्हटलं आहे. दरम्यान, पोलिसांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. ही मुलं कोण होती हे आयोजकांनाही माहित नाही, त्यांच्याशी आपलं काहीच बोलणं झालं नसल्याचं मानवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक रमेश स्वामी यांनी म्हटलं आहे. 

हे तरुण कोण होते? त्यांचा शोभायात्रेशी काही संबंध होता का? विषारी औषध प्राशस करण्याचं अन्य काही कारण आहे का? याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. 

राज्यात भव्य शोभायात्रा
रामनवमीनिमित्ताने राज्यात ठिकठिकाणी शोभायात्रा काढण्यात आल्या होत्या. चंद्रपूर शहरात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आलं होतं. चंद्रपूरच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरातून निघालेल्या रॅलीत हजारो चंद्रपूरकरांनी उत्साही सहभाग घेतला. जुन्या चंद्रपूर शहरातील समाधी वॉर्ड परिसरात असलेल्या काळाराम मंदिराच्या मुख्य मूर्ती रथावर विराजमान करून रथयात्रेला सुरुवात झाली. आकर्षक देखावे, पारंपरिक वेशातील चिमुकले आणि नयनरम्य रोषणाईने शहरात रामनामाचा गजर होत राहिला. 

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील वांगणी गावात 1826 साला पासून रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.  गावात पालखी निघते , या पालखी सोहळ्याची 119 वर्षाची परंपरा आहे. ही  पालखी संपूर्ण गावातील प्रत्येक आळीत फिरते. या पालखी सोहळ्यात भजनी मंडळ , राम लक्ष्मण सीता यांचा आकर्षक रथ , तसंच घोड्यावर बसलेले छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांचा वेश परिधान केलेले तरुण सहभागी झाले होते.