'पर्यटननगरी' रायगडमध्ये भरलंय खड्ड्यांचं प्रदर्शन

खरं तर रायगड जिल्हा म्हणजे पर्यटननगरी... कारखानदारीही वाढते... पण इथं येण्यासाठीचा तुमचा रस्ता खडतर बनलाय... कारण इथं रस्ते आहेत की खड्डे असा प्रश्न पडतोय.

Updated: Jul 26, 2017, 11:09 AM IST
'पर्यटननगरी' रायगडमध्ये भरलंय खड्ड्यांचं प्रदर्शन title=

अमोल पाटील, झी मीडिया, रायगड : खरं तर रायगड जिल्हा म्हणजे पर्यटननगरी... कारखानदारीही वाढते... पण इथं येण्यासाठीचा तुमचा रस्ता खडतर बनलाय... कारण इथं रस्ते आहेत की खड्डे असा प्रश्न पडतोय.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग असो नाही तर रायगड जिल्ह्यातला कुठलाही मार्ग... वाहन चालकांच्या स्वागतासाठी सध्या असेच सगळीकडेच खड्डेच खड्डे पहायला मिळतात. अशा स्थितीत जिल्ह्याला वाली कुणीच नसल्याचं दिसतंय. पालकमंत्री प्रकाश मेहता जिल्हा नियोजन बैठकी व्यतिरिक्त जिल्ह्यात फिरकतदेखील नाहीत. अधिकाऱ्यांचं लक्ष नाही.

या सगळ्याच्या विरोधात खालापूर युवक राष्ट्रवादीनं जिल्ह्यात पडलेल्या खड्ड्यांचं प्रदर्शन भरवलंय. जोपर्यंत खड्डे भरले जात नाहीत तोपर्यंत हे प्रदर्शन सुरूच राहणार आहे.

दरम्यान, कर्जतचे आमदार सुरेश लाड आणि खालापुरातील सामाजिक कार्यकर्ते जे. पी. पाटील यांनी स्वखर्चानं खड्डे भरण्याचं काम सुरू केलंय.

अपघातांच्या किती घटना घडल्यानंतर प्रशासनाला जाग येणार असा सवाल संतप्त रायगडवासीय विचारत आहेत. लवकरात लवकर रस्ते दुरुस्ती झाली नाही तर नागरिकांच्या आणखी रोषाला सामोरं जावं लागेल.