किरण ताजणे, झी मीडिया, नाशिक : नाशिक : मुंबई, पुणे आणि नागपूरनंतर आता नाशिककरांनाही मेट्रो सेवा मिळणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वीच नाशिक मेट्रो सेवेच्या कामाचा शुभारंभ करण्याच्या हालचालीही सुरु झाल्या आहेत. ३१ किलोमीटर लांबीच्या रस्त्याची व्यवहार्यता तपासणी सुद्धा झाली आहे. दोन ते तीन महिन्यांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. मात्र ही मेट्रो रेल्वे नसून टायर बेस्ड मेट्रो म्हणजेच आर्टिक्युलेटेड बस असणार आहे. त्यामुळे मेट्रोच्या नावाखाली नाशिककरांची फसवणूक होत असल्याची भावनाही व्यक्त केली जात आहे.
नाशिक शहराचे पालकत्व स्वीकारलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून नाशिककरांना लवकरच मेट्रोचं गिफ्ट मिळणार आहे. त्यामुळे मंत्रभूमी म्हणून ओळख असणारी नाशिक नगरी मेट्रोसिटी म्हणून ओळखली जाणार आहे. नाशिक महापालिकेची सत्ता हाती घेतल्यानंतर मुंबईनंतर पुणे, नागपूर पाठोपाठ नशिकमध्येही मेट्रो धावेल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी दिलं होतं. त्या दृष्टीनं व्यवहार्यता तपासणी पूर्ण झाली आहे.
नाशिकमध्ये पहिल्या टप्पात ३१ किलोमीटरपर्यंत मेट्रो धावणार आहे. मात्र ही मेट्रो रेल्वे नसून टायर बेस्ड मेट्रो म्हणजेच आर्टिक्युलेटेड बस असणार आहे. यामध्ये बॅटरीवर चालणाऱ्या दोन बस एकमेकांना जोडलेल्या असतील. रॅपिड ट्रान्झिट सिस्टम प्रणालीद्वारे ही सेवा कार्यरत होणार आहे. सुरुवातीला दोन मार्गांवर ही मेट्रो धावेल. मात्र मेट्रोची खरंच गरज आहे का? त्याऐवजी दुसरी मूलभूत कामं करा अशा संमिश्र प्रतिक्रिया नाशिककरांकडून व्यक्त केल्या जात आहेत.
नाशिकवासियांना मेट्रो रेल्वेचं स्वप्न दाखवण्यात आलं. मात्र प्रत्यक्षात बस धावणार असल्यानं भाजप सरकार दिशाभूल करत असल्याची भावना नाशिककर व्यक्त करत आहेत.